मुंबई, 10 ऑक्टोबर : बँकिंग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आणखी एका सहकारी बँकेला मोठा धक्का बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पुण्यातील सेवा विकास सहकारी बँक लि. या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नाही किंवा तिच्याकडे कमाईची शक्यता नाही, त्यामुळे तिचा परवाना रद्द करण्यात येत आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 99 टक्के ठेवीदार त्यांच्या संपूर्ण ठेवी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत मिळविण्यास पात्र आहेत. DICGC ने 14 सप्टेंबरपर्यंत एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 152.36 कोटी रुपये भरले होते. 10 ऑक्टोबरला सेवा विकास सहकारी बँक बंद - रिझर्व्ह बँकेने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, बँकेकडे पुरेसे भांडवल किंवा उत्पन्नाची शक्यता नाही, सहकारी बँक 10 ऑक्टोबरच्या कामकाजाच्या वेळेनंतर व्यवसाय करू शकणार नाही. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, बँक सध्याच्या आर्थिक स्थितीत सध्याच्या ठेवीदारांना संपूर्ण रक्कम देण्यास सक्षम नाही. सेवा विकास सहकारी बँकेला बँकिंग व्यवसायापासून बंदी घालण्यात आली आहे. इतर गोष्टींबरोबरच, बँक ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा तत्काळ प्रभावाने ठेवींचे पेमेंट करू शकणार नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. हेही वाचा - TCS Q2 Results : दिवाळी आधी टीसीएसने दिली चांगली बातमी, गुंतवणूकदारांसाठी लाभांशाची घोषणा बँक बुडाल्यास 5 लाख रुपयांपर्यंतची सुरक्षितता - DICGC विमा योजनेअंतर्गत, बँकांमध्ये जमा केलेल्या रकमेचा 5 लाख रुपयांपर्यंत विमा उतरवला जातो. यामुळे, बँक दिवाळखोर झाल्यास किंवा तिचा परवाना रद्द झाल्यास, ग्राहकांना अशी ठेव रक्कम गमावण्याचा धोका नाही. DICGC, भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे, जे 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक ठेवींवर विमा संरक्षण देते.