ratiनवी दिल्ली, 20 मार्च : मोदी सरकारने रेशन कार्डधारकांना (Ration Card Holder) मोठी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, रेशन सुविधा घेण्यासाठी आता रेशन कार्ड सोबत (Ration Card) ठेवणं आवश्यक असणार नाही. याबाबत अधिक माहिती देताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं, की आता रेशन कार्डधारकांना रेशनची सुविधा घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही. आतापर्यंत रेशन धान्य दुकानात धान्य घेताना शिधापत्रिकाधारकांना रेशन कार्ड द्यावं लागत होतं. परंतु आता रेशन कार्ड होल्डर जिथे राहतात, तिथे जवळच्या रेशन धान्य दुकानात रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर (Ration Card Number and Aadhaar Card Number) सांगावा लागेल. त्यानंतर त्यांना सहजपणे रेशन मिळेल.
पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्ड प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. देशात वन नेशन वन रेशन कार्डची (One Nation One Ration Card) सुविधा लागू करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात वन नेशन वन रेशन कार्डद्वारे 77 कोटी लोकांना जोडण्यात आलं आहे. यात रेशन कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 96.8 टक्के आहे. यात 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांना सामिल करण्यात आलं आहे.
एखाद्या व्यक्तीचं रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल, तर त्याला त्याचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन कोणत्याही दुकानातून रेशन धान्य मिळू शकतं. यासाठी मूळ रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारांना वन नेशन वन रेशनसाठी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.