नवी दिल्ली, 22 मार्च : मुंबईतील मलबार हिल (Malabar Hill) परिसरामध्ये रिजवे अपार्टमेंट्स (Ridgeway Apartments) नावाची एक छोटी आणि देखणी इमारत होती. या इमारतीमध्ये दोन मोठ्या मल्टिनॅशनल बँकांच्या (Multinational Banks) मालकीचे फक्त 12 अपार्टमेंट्स होते. बँकेतील उच्चपदस्थ अधिकारी या इमारतीत रहायचे. या अपार्टमेंट्स प्रशस्त होत्या तसंच त्यांना हाय सिलिंग होतं. आकर्षक रचना असलेल्या या अपार्टमेंट्समधून मरिन ड्राइव्हचा (Marine Drive) सुंदर व्ह्यू दिसायचा. आसपासच्या इतर इमारतींच्या तुलनेत रिजवे अपार्टमेंट्समध्ये फारच कमी लोक वास्तव्याला होते. 2013 मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड (Standard Chartered) या एका बँकेनं आपल्या मालकीच्या सहा अपार्टमेंट्स विकण्याचा निर्णय घेतला. विक्रीचा व्यवहार करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. अपार्टमेंट्सची वैयक्तिक विक्री करायची की सरसकट विक्री करायची यावर चर्चा झाली. फक्त अपार्टमेंटपेक्षा इमारतीच्या जागेला जास्त किंमत मिळू शकते ही गोष्ट बँकेच्या लक्षात आली. म्हणून, स्टँडर्ड चार्टर्डनं आपल्या मालकीच्या सर्व सहा अपार्टमेंट्स विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतला. एखादं श्रीमंत कुटुंब सहा अपार्टमेंट्सऐवजी संपूर्ण इमारतच खरेदी करण्याची तयारी दाखवेल जेणेकरून दुसऱ्या बँकेच्या मालकीचे असलेले सहा अपार्टमेंट्सदेखील विक्रीसाठी निघतील, अशी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला आशा होती. अब्जाधीश गिऱ्हाईक नेमकं त्याचवेळी एक अब्जाधीश स्टॉक इन्व्हेस्टर (Billionaire Stock Investor) नवीन घराच्या शोधात होता. ती व्यक्ती होती ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala). त्यांना फक्त एक किंवा दोन अपार्टमेंट्स नाही तर एक संपूर्ण इमारत पाहिजे होती. त्यांच्या सध्याच्या बिल्डिंगमध्ये अपार्टमेंट्सची संख्या जास्त आणि विक्रेत्यांची संख्या खूप कमी होती. तर दुसरीकडं, रिजवे अपार्टमेंट्समध्ये फक्त 12 अपार्टमेंट आणि एचएसबीसी (HSBC) व स्टँडर्ड चार्टर्ड हे दोनच मालक होते. स्टँडर्ड चार्टर्डनं तर आपला हिस्सा विक्रीसाठी मार्केटमध्ये आणलाच होता. आता फक्त एचएसबीसीला तयार करणं गरजेचं होतं. झुनझुनवालांसाठी ही गोष्ट अवघड नव्हती पण त्यांनी वाट पाहण्याचा निर्णय घेतला.
झुनझुनवालांनी 2013 मध्ये, 176 कोटी रुपये मोजून पहिल्या सहा अपार्टमेंट्सची खरेदी केली. ही रक्कम किमान राखीव किंमतीपेक्षा 20 टक्के जास्त होती. उर्वरित सहा अपार्टमेंट ब्लॉकवर येण्याची त्यांनी वाट पाहिली. चार वर्षांनंतर म्हणजे 2017 मध्ये एचएसबीसीच्या मालकीचे उर्वरित सहा अपार्टमेंट्स विक्रीसाठी ठेवण्यात आले. या वेळीदेखील झुनझुनवालांकडून सर्वाधिक बोली लागणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यांनी 195 कोटी रुपयांची किंमत देऊन अपार्टमेंट्ससह संपूर्ण इमारत ताब्यात घेतली. ही इमारत पाडून स्वतःसाठी बंगला (Bungalow) बांधण्याची त्यांची योजना होती. मात्र, नंतर ती रद्द करण्यात आली. त्यांनी आता आपल्यासाठी 13 मजल्यांची एक सी फेसिंग इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम (Construction) प्रक्रियेमध्ये राकेश झुनझुनवालांना किती अनुभव आहे, याबद्दल अंदाज नाही. मात्र, घर बांधण्यास इच्छुक असलेल्या इतर कुठल्याही व्यक्तीसारखा त्यांचाही कस लागलाच असेल. घर बांधणी प्रक्रियेतील असंख्य नियम आणि लहान-मोठ्या धोरणांचा त्यांनाही त्रास झाला असण्याची शक्यता आहे. झुनझुनवालादेखील कदाचित निराश झाले असतील पण. घर बांधण्याचे बारीकसारीक पैलू समजून घेण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केल्याचं दिसतं आहे. झुनझुनवाला यांच्या घरबांधणी प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या एजन्सींपैकी एक असलेल्या मेसर्स आकार आर्किटेक्ट्स अँड कन्सल्टंट्सचे (M/s Aakar Architects and Consultants) अमित पवार सांगतात की, म्युनिसिपल ऑथॉरिटीच्या मान्यतेमध्ये येणारा प्रत्येक खर्च समजून घेण्यात झुनझुनवाला यांनी विशेष रस दाखवला. एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वतंत्र घरासाठी महानगरपालिकेला (Municipal Authority) काही प्रीमियम्स द्यावे लागतात. या प्रीमियम्सच्या संदर्भात त्यांनी विशेष मेहनत घेतली.
अशी असेल झुनझुनवालांच्या घराची इमारत तब्बल 70 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या झुनझुनवाला टॉवरला पालिकेकडून मान्यता मिळाली आहे. या इमारतीतील प्रत्येक मजल्याचं वेगळं वैशिष्ट्य असेल. चौथ्या मजल्यावर एक बँक्वेट हॉल (Banquet Hall) आहे, ज्यामध्ये झुनझुनवाला कुटुंब एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करू शकतं. आठव्या मजल्यावर जिम (Gym) आणि मसाजसारख्या सुविधा आहेत. 10व्या मजल्यावर चार मोठे गेस्ट बेडरूम (Guest Bedrooms) आहेत. तर, अकरावा मजला मुलांना दिला जाणार आहे. 12वा मजला सर्वात जास्त प्रशस्त असून जिथे झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी राहणार आहे. या मजल्यावरील प्रत्येक खोली प्रशस्त आहे. त्यांच्या बाथरूमचा आकार मुंबईत विकल्या जाणार्या सरासरी 1 बीएचके (1BHK) फ्लॅटपेक्षाही जास्त मोठा आहे. तर, त्यांची 731 स्क्वेअर फूटची मास्टर बेडरूम सध्या बिल्डर्स विकत असलेल्या 2 बीएचके (2BHK) फ्लॅटपेक्षा 20 टक्क्यांनी मोठी आहे. झुनझुनवालांची लिव्हिंग (Living Room) आणि डायनिंग रूम (Dining Room) एखाद्या लक्झरी प्रोजेक्टमधील 3 बीएचके अपार्टमेंटच्या आकारापेक्षाही मोठी आहे. सर्वात वर टेरेस असेल, ज्यामध्ये व्हेजिटेबल गार्डन (Vegetable Garden), कंझर्व्हेटरी एरिया (Conservatory Area) आणि आउटर सीटिंग डेकचा समावेश आहे. अद्याप या घराचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही. पण, जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा, संपूर्ण इमारतीची मालकी असलेले राकेश झुनझुनवाला हे भारतातील आणखी एक मोठे अब्जाधीश ठरतील.