मुंबई, 11 ऑक्टोबर: कोरोना महामारीच्या काळात हजारो लोकांचा रोजगार ठप्प झाला होता. विशेषत: रस्त्यावरील विक्रेत्यांना कोविडच्या काळात खूप अडचणींचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळं त्यांचा व्यवसाय कोलमडला. अशा परिस्थितीत त्यांना स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालं होतं. अशा लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम स्वानिधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत रोजगार सुरू करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देतं. सरकारनं ही योजना विशेषतः रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी किंवा फेरीवाल्यांसाठी सुरू केली आहे, ज्यांना कोविडच्या काळात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं होतं. आतापर्यंत अनेकांना झालं कर्जाचं वाटप- रस्त्यावरील विक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्यासाठी 1 जून 2020 रोजी पंतप्रधान स्वानिधी योजना सुरू करण्यात आली. या वर्षी 7 जुलै रोजी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत 53.7 लाख पात्र अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 36.6 लाख कर्ज मंजूर झाले असून 33.2 लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जुलैपर्यंत एकूण 3,592 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. सुमारे 12 लाख व्यावसायिकांनी त्यांचं कर्जही फेडल्याचं सरकारनं सांगितलं होतं. सबसिडी - पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचं काम पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार 10 हजार रुपयांचं कर्ज देतं. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे सरकार कर्जावर सबसिडी देखील देतं. कर्जाची परतफेड झाल्यावर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते. हमीशिवाय कर्ज मिळवा- समजा एखाद्यानं पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत पहिल्यांदा 10 हजार रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्यानं ते वेळेवर फेडलं. तर अशा परिस्थितीत तो दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचं कर्ज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी तो पात्र ठरणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत कर्ज घेण्यासाठी कोणतीही हमी देण्याची गरज नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात तीन वेळा हस्तांतरित केली जाते. हेही वाचा: तुमच्याकडेही Hallmark नसलेले सोन्याचे दागिने आहेत का? आता काय करायचं? कर्ज परतफेड कालावधी- पीएम स्वानिधी योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. तुम्ही दरमहा कर्जाची रक्कम हप्त्यांमध्ये परत करू शकता. पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा? या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी बँकेत कर्जासाठी अर्ज करता येतो. सरकारी बँकेत पीएम स्वानिधी योजनेचा फॉर्म भरा. तुम्हाला तुमच्या आधार कार्डची छायाप्रत फॉर्मसोबत जोडावी लागेल. यानंतर, तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, कर्जाचा पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कॅश-बॅकसह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं या योजनेचे बजेट वाढवलं आहे.