मुंबई, 21 सप्टेंबर : बँक ग्राहकांना आपल्या खात्यात किमान शिल्लक (minimum Account balance) ठेवणं बंधनकारक आहे. किमान शिल्लक न ठेवल्यास बँक खातेदाराकडून दंड (penalty) वसूल करते. बँक खात्यात (bank account) किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांकडून सर्वच बँका शुल्क आकारतात. सार्वजनिक क्षेत्रातल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) 2020-21 या आर्थिक वर्षात खात्यात किमान शिल्लक न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून एकंदर 170 कोटी रुपये एवढा दंड वसूल केला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत (आरटीआय) बँकेने ही माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) 2019-20 या आर्थिक वर्षात या शुल्कापोटी 286.24 कोटी रुपये वसूल केले होते. बँक आर्थिक वर्षात तिमाही आधारावर हे शुल्क आकारते. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेने त्रैमासिक सरासरी शिल्लक शुल्क म्हणून 35.46 कोटी रुपये वसूल केले. हे शुल्क बचत आणि चालू अशा दोन्ही प्रकारच्या खात्यांवर आकारण्यात आलं होतं. हे वाचा - गृहकर्ज घेताय तर लक्षात घ्या हे महत्त्वाचे 6 मुद्दे! सोप्या पद्धतीने मिळेल Loan मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेने असं कोणतंही शुल्क आकारलं नाही. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत बँकेने किमान शिल्लक न ठेवलेल्या खातेदारांकडून अनुक्रमे 48.11 कोटी आणि 86.11 कोटी रुपये वसूल केले. पीएनबीला मागील आर्थिक वर्षात एटीएम शुल्काच्या स्वरूपात 74.28 कोटी रुपये मिळाले आहेत. 2019-20 मध्ये बँकेने या शुल्कापोटी 114.08 कोटी रुपये वसूल केले होते. मध्य प्रदेशातले सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी आरटीआयअंतर्गत बँकेकडून याबाबत माहिती मागितली होती. मध्य प्रदेशातले सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी आरटीआयअंतर्गत बँकेकडून याबाबत माहिती मागितली होती. हे वाचा - 1 ऑक्टोबरपासून या बँकांचं चेकबुक वापरून करता येणार नाही पेमेंट, वाचा सविस्तर खात्यात किमान शिल्लक नसल्यास आकारण्यात येणारी दंडाची रक्कम प्रत्येक बँकेनुसार आणि बँक शाखांच्या भौगोलिक स्थानानुसार ठरते. महानगर आणि शहरी भागांतल्या बँका निमशहरी बँक शाखांच्या तुलनेत जास्त दंड आकारतात. आवश्यक किमान जमा रकमेपेक्षा खात्यातली रक्कम पन्नास टक्के कमी असेल तर महानगर आणि शहरी भागांतल्या बँका दरमहा 30 रुपये (अधिक जीएसटी) दंड आकारतात. शिल्लक रक्कम 50 ते 75 टक्के कमी असल्यास 40 रुपये आणि 75 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास 50 रुपये दंड दरमहा लागू होतो. निमशहरी भागांतल्या बँक शाखात दंडाची ही रक्कम अनुक्रमे 20, 30 आणि 40 रुपये आहे. खासगी बँकांमध्ये मात्र दंडाची रक्कम अधिक असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार प्रत्येक बँकेने आपल्या खातेदारांना दंड आकारण्यापूर्वी सूचित करणं बंधनकारक असतं.