नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : सतत वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. एकीकडे घरांच्या किमतीत, पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ होते आहे. तर दुसरीकडे दररोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंच्या, खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होत आहे. किरकोळ महागाई दर (Retail Inflation) 6 वर पोहोचला आहे. साबण, डिशवॉशसारख्या वस्तू महाग झाल्यानंतर आता दोन मिनिटांत बनणारी मॅगी (Maggi), तसंच चॉकलेटच्या (Chocolate) किमतीत वाढ होणार आहे. कॉफीचा दरही वाढण्याकडे लक्ष आहे. किटकॅट, नेस्कॅफे (Nestle) बनवणारी कंपनी नेस्ले लवकरच आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ करणार आहे. ग्राहकांना महागाईचा फटका - नेस्लेने ते आपल्या दोन उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचं म्हटलं आहे. नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी सांगितलं, की फूड आणि कमॉडिटीतील वाढती महागाई चिंतेचा विषय आहे. कंपनी त्याची किंमत कमी करण्यासाठी आता काही बोजा ग्राहकांवर टाकेल. त्यामुळे वस्तूच्या किमती वाढवणं गरजेचं आहे.
3.1 टक्के वाढू शकतो दर - वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी आर्थिक परिणामांपूर्वीच किमती 3.1 टक्क्यांनी वाढू शकतात असं नेस्लेने म्हटलं आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये इनपुट कॉस्ट आणखी वाढेल. अशा स्थितीत दरवाढ करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी कच्चा माल, कामगारांच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादनांच्या किमती वाढण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना काळात कॉफी, घरगुती उत्पादन आणि हेल्दी फूड प्रोडक्ट्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं कंपनीने म्हटलं. पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल महाग झाल्यानंतरआता साबण (Soap), सर्फ (Surf), डिशवॉश (Dish Wash) सारख्या वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेडने (Hindustan Unilever Limited-HUL) फेब्रुवारीमध्ये या वस्तूंच्या दरात 3 ते 10 टक्क्यांची वाढ केली आहे.