नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इंश्योरेंस कंपनी अर्थातचं LIC ग्राहकांची गरज लक्षात घेऊन विविध विमा पॉलिसी देत असते. या कंपनीच्या विम्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना बरेच फायदे दिले जातात. आजच्या घडीला प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात. बरेचजण मुलांचं शिक्षण, लग्न आणि इतर खर्चासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतात. भारतीय जीवन विमा निगममध्येही अशीच एक योजना आहे, जी मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. LIC च्या या नवीन विमा योजनेचं नाव ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लान’ (LIC New Children’s Money Back Plan) असं आहे. चला तर मग जाणून घेऊया, विम्याबद्दलची विशेष माहिती » हा विमा घेण्यासाठी किमान 0 वर्षे वयाची अट आहे. » विमा घेण्याचं कमाल वय 12 वर्षे आहे. » या विम्याची किमान रक्कम 10,000 रुपये इतकी आहे. » विम्याच्या कमाल रक्कमेसाठी कोणतीही मर्यादा नाही. » प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर-पर्याय देखील उपलब्ध आहे. मॅच्युरिटीचा कालावधी - एलआयसीच्या न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅंक योजनेची एकूण मुदत 25 वर्षे आहे. मनी बॅक हप्ता- या योजनेंतर्गत, मुलाच्या 18 व्या वर्षी, 20 व्या वर्षी आणि 22 व्या वर्षी विमा उतरलेल्या मूलभूत रकमेपैकी प्रत्येकी 20 टक्के रक्कम एलआयसी देते. उर्वरित 40 टक्के रक्कम पॉलिसीधारकाचं वय 25 वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाईल. याव्यतिरिक्त 25 व्या वर्षी सर्व थकबाकी आणि बोनस रक्कम दिली जाईल. मॅच्युरिटी बेनिफिट - पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळी (विमा कालावधीत जर विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाला नसेल तर) पॉलिसीधारकाला विमा रक्कमेची उर्वरित 40% रक्कम बोनससहीत मिळेल. डेथ बेनिफिट - विमाधारकाचा विमा मुदतीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास, त्याला विमा रकमेव्यतिरिक्त, साधारण प्रवर्तक बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. डेथ बेनेफिट हा एकूण प्रीमियम पेमेंटच्या 105 टक्के पेक्षा कमी असू शकणार नाही.