Indigoमधून स्वस्तात मस्त प्रवासाची संधी केवळ 2023 रूपयांत मिळणार डोमेस्टिक तिकीट
नवी दिल्ली, 23 डिसेंबर : सध्या 2022 या वर्षातल्या डिसेंबर महिन्याचे अगदी शेवटचे थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. वर्षअखेर आणि नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येच्या या दिवसांत सर्वत्र जल्लोषाचं, उत्साहाचं वातावरण असतं. त्यात भर पडते ती वेगवेगळ्या खरेदी उत्सवांमुळे आणि दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींमुळे. ही बातमी आहे अशाच एका सवलतीची. इंडिगो या देशातल्या तुलनेने स्वस्त विमानवाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तीन दिवसांच्या विंट डे सेलची घोषणा केली आहे. त्यात देशांतर्गत, तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिटं सवलतीत उपलब्ध होणार आहेत. इंडिगो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 या तीन दिवसांच्या काळात हा विंटर सेल सुरू राहणार आहे. या तीन दिवसांत बुकिंग केल्यास देशांतर्गत वाहतुकीचं तिकीट 2023 रुपयांपासून, तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीचं तिकीट 4999 रुपयांपासून उपलब्ध होऊ शकेल. 15 जानेवारी 2023 ते 14 एप्रिल 2023 या कालावधीतल्या प्रवासासाठीची तिकिटं 23 ते 25 डिसेंबर 2022 या काळात सवलतीच्या दरात बुक करता येतील. हेही वाचा: नव्या वर्षात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, CNG-PNG आणि वीज स्वस्त होणार? कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर अन्य कोणत्या ऑफरशी, स्कीमशी किंवा प्रमोशनशी जोडली जाऊ शकणार नाही. तसंच, ही ऑफर इंडिगोच्या ग्रुप बुकिंगवर उपलब्ध नाही, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. या ऑफरमध्ये खरेदी केलेली तिकिटं नॉन-ट्रान्स्फरेबल, नॉन-एक्स्चेंजेबल आणि नॉन-एन्कॅशेबल असतील, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, ही ऑफर मर्यादित स्वरूपात आणि मर्यादित कालावधीत उपलब्ध असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. त्यामुळे उपलब्धतेनुसार ग्राहकांना डिस्काउंट दिला जाणार आहे. ही ऑफर इंडिगोच्या देशांतर्गत, तसंच इंटरनॅशनल नेटवर्कमधल्या वेगवेगळ्या सेक्टर्समधल्या नॉन-स्टॉप विमानांमधल्या प्रवासांसाठीच उपलब्ध आहे, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. HSBC ही इंडिगोची पार्टनर बँक असून, त्या बँकेच्या माध्यमातून बुकिंग केल्यास ग्राहक कॅशबॅकचा लाभही मिळवू शकतात, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. इंडिगो कंपनीच्या स्वतःच्या ताफ्यात 290 विमानं असून, या कंपनीद्वारे दररोज 1600हून अधिक विमानांची उड्डाणं नियंत्रित केली जातात. ही कंपनी देशांतर्गत 76, तर 26 आंतरराष्ट्रीय ठिकाणं आपल्या सेवेद्वारे जोडते. ‘आपण आता 2023मध्ये प्रवेश करत आहोत. विमान वाहतूक क्षेत्रात चांगली सुधारणा झाल्याप्रीत्यर्थ सुट्ट्यांच्या या काळात आम्ही सेलिब्रेशन करत आहोत. त्या निमित्ताने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी विंटर सेलची घोषणा करत आहोत,’ असं इंडिगो कंपनीचे ग्लोबल सेल्स हेड विनय मल्होत्रा यांनी सांगितलं. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं, की हवाई वाहतुकीत ऑक्टोबर 2022मध्ये सुमारे 27 टक्के वाढ झाली.