कॅपिटल गेन टॅक्स हा कोणत्याही भांडवलाच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर आकारला जाणारा टॅक्स आहे.
मुंबई : कोणत्याही भांडवली मालमत्तेच्या मूल्यात वाढ होण्याला भांडवली नफा म्हणजेच कॅपिटल गेन म्हणतात. जेव्हा एखादी मालमत्ता विकली जाते तेव्हा कॅपिटल गेन मिळतो. कॅपिटल गेन दोन प्रकारचा असतो, पहिला म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन.
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन
जेव्हा कोणतंही भांडवल किंवा मालमत्ता त्या आधीच्या विक्रीपासून 2 वर्षांच्या आत विकली जाते, तेव्हा त्यातून कमवलेल्या नफ्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात. आयकर स्लॅबनुसार शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो.
लाँग टर्म कॅपिटल गेन
जेव्हा कोणतंही भांडवल त्या आधीच्या विक्रीपासून 2 वर्षांनंतर विकलं जातं, तेव्हा त्यातून कमवलेल्या नफ्याला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. टॅक्स इंडेक्सेशनसह 20.6 टक्के दराने लाँग टर्म कॅपिटल गेन आकारला जातो.
कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय?
कॅपिटल गेन टॅक्स हा कोणत्याही भांडवलाच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर आकारला जाणारा टॅक्स आहे. कॅपिटल गेन कॅपिटल अॅसेट्सवर लागू होतो.
कॅपिटल अॅसेट्स या अशा वस्तू असतात, ज्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या वापरासाठी किंवा मालकीसाठी खरेदी करता. पण नंतर त्यांची किंमत वाढल्यावर त्या जास्त किमतीत विकल्या जाऊ शकतात. यामध्ये जमिन, प्लॉट, सोनं, शेअर्स यांचा समावेश असतो.
कॅपिटल गेन टॅक्स कसा ठरवला जातो?
कॅपिटल गेन्सवर टॅक्स आकारण्यापूर्वी त्यावर कमवलेल्या नफ्याची गणना करणं फार महत्त्वाचं आहे. सामान्य वस्तूंच्या विक्रीतून नफा मिळवणं, ही एक सोपी प्रक्रिया आहे, परंतु कॅपिटल गेन काढण्यासाठी ही पद्धत थोडी वेगळी आहे. कॅपिटल गेन मोजण्यासाठी विक्रेत्याला तीन गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
भांडवल विकून रिअल इन्कम किती वाढले?
कोणतंही भांडवल विकल्यानंतर मिळालेले पैसे विक्रेत्याचं उत्पन्न पूर्णपणे वाढवत नाहीत. कारण भांडवल विकण्याच्या प्रक्रियेत अनेक खर्चही त्यात जोडले जातात. यामध्ये Advertisement व एजंटचं कमिशन याचा समावेश होतो. त्यामुळे हे खर्च वजा केल्यावर रिअल इन्कम किती वाढला, हे कळतं.
गुंतवणुकीची रक्कम आजमितीला किती?
जर एखाद्याने त्याने खरेदी केलेलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपली संपत्ती विकली असेल तर ते खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी, कमिशन इत्यादीमध्ये किती खर्च झाला, ते सर्व एकत्र करून त्याची आजमितीला किती व्हॅल्यू आहे, याचा हिशेब मांडणं आवश्यक आहे. दोन्ही वरच्या स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर, विक्रेता त्याच्या वास्तविक उत्पन्नातून भांडवलावर केलेली गुंतवणूक वजा करतो. त्यातून मिळणारी रक्कम म्हणजे कॅपिटल गेन होय.
कॅपिटल गेन टॅक्स
कॅपिटल गेन म्हणून झालेलं उत्पन्न तुमच्या सर्व उत्पन्नासह जोडा, त्यानंतर जी रक्कम असेल ती टॅक्स एक्सेम्पशन आणि कपातीनंतर टॅक्स स्लॅबमध्ये बसली तर त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल.