लिहून घ्या! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेमध्ये मिळते संपूर्ण सुरक्षिततेची हमी अन् बँकेपेक्षा जास्त परतावा
मुंबई, 5 सप्टेंबर: अलीकडच्या काळात गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु तरीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायला लोकांची पहिली पसंती असते. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय आरामात गुंतवणूक करू शकता आणि बँकेकडून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा अधिक परतावा मिळवू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या या योजना चांगल्या परताव्यासह तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी देतात. त्यामुळं येथे गुंतवणूक करणं चांगले आहे. तुम्हाला कोणताही धोका राहत नाही. येथील योजनांचे व्याजदर दर तिमाहीत ठरवले जातात. म्हणजेच तुम्हाला केव्हा आणि किती व्याज किंवा परतावा मिळणार आहे हे तुम्हाला आधीच माहीत असते. जर तुम्ही अद्याप पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही बचत योजनेत गुंतवणूक केली नसेल, तर त्याबद्दल जाणून घेऊन तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. हे तुमच्या भविष्यातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र- तुम्ही पोस्ट ऑफिसच्या NSC योजनेत पैसे गुंतवू शकता. NSC ही केंद्र सरकार समर्थित योजना आहे. तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये व्याज दरवर्षी चक्रवाढ दिलं जातं. परंतु गुंतवणूकदाराला त्याचे पेमेंट मॅच्युरिटीवरच मिळते. NSC ही लोकप्रिय पोस्ट ऑफिस बचत योजनांपैकी एक आहे, जी कलम 80C अंतर्गत कर लाभांसह हमी परतावा प्रदान करते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ज्येष्ठ नागरिक बचत योजना- जर तुम्ही वयाची 60 वर्षे पूर्ण केली असेल आणि तुम्हाला कर बचतीचे फायदे तसेच बँक FD पेक्षा जास्त परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ नागरिक योजनेत गुंतवणूक करून चांगले परतावा मिळवू शकता. या योजनेत गुंतवणुकीवर तुम्हाला 7.4 टक्के व्याजदर मिळेल. हे व्याज दर तीन महिन्यांनी ठेवीवर जमा होते. यामध्ये तुम्ही किमान रु 1,000 आणि कमाल रु 15 लाख गुंतवू शकता. यामध्ये तुम्ही 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. हेही वाचा: खरंच! तुमच्या सॅलरी अकाउंटवर मिळतात ‘या’ खास सुविधा, वाचा संपूर्ण डिटेल्स पब्लिक प्रोव्हिडंट फंड अकाउंट - पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाऊंट (PPF) मध्ये गुंतवणूक केल्यानं, तुम्हाला चांगल्या परताव्यासह कर बचतीचा लाभ मिळतो. या योजनेवर तुम्हाला चक्रवाढ गुंतवणूक म्हणून 7.10 टक्के परतावा मिळेल. तुम्ही एकूण 15 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत पैसे गुंतवू शकता. यामध्ये किमान गुंतवणूक रक्कम 500 रुपये आहे, जी प्रत्येक आर्थिक वर्षासाठी कमाल 1.5 लाख रुपये असू शकते. 3 वर्षांनंतर तुम्ही त्यावर कर्ज देखील घेऊ शकता आणि 5 वर्षांनंतर तुम्ही गरज पडल्यास या खात्यातून काही रक्कम सहज काढू शकता.
सुकन्या समृद्धी योजना- ही एक उत्तम योजना आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी गुंतवणूक करून मोठा निधी मिळवू शकता. ही योजना 7.6 टक्के व्याज दर देते. जो बँकेपेक्षा जास्त आहे. या योजनेत तुम्ही तीन महिन्यांच्या मुलीपासून ते 10 वर्षांच्या मुलीसाठी खाते उघडू शकता. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये गुंतवू शकता. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूटही मिळते. दुसरीकडे, मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर, तुम्ही खात्यातून संपूर्ण रक्कम काढू शकता.