आधार कार्ड 10 वर्षं जुनं असेल तर येऊ शकतात अडचणी; ही प्रोसेस वापरून करा अपडेट
मुंबई, 12 ऑक्टोबर: भारतीयांची ओळख सांगणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्डविना तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. बँक अकाउंट उघडायचं असेल तरी ‘आधार’ असणं गरजेचं आहे. परंतु, ते आधार कार्ड 10 वर्षं जुनं असेल तर त्याला अपडेट करण्याचा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून देण्यात आलाय. आधार कार्डधारकांनी ओळखीचं प्रमाणपत्र, पत्ता व इतर संबंधित कागदपत्रं अपडेट करण्याबाबत यूआयडीएआयनं सांगितलं आहे. आधार कार्डला ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीनं अपडेट करता येतं. ज्या नागरिकांनी 10 वर्षांआधी आधार कार्ड काढलं आहे आणि दरम्यानच्या काळात त्याला एकदाही अपडेट केललं नाही अशांनी त्याला तत्काळ अपडेट करण्याची गरज असल्याचं यूआयडीएआयच्या वतीनं सांगितलं गेलंय. अपडेट करणं बंधनकारक नाही यूआयडीएआयनं दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्ड अपडेट करणं बंधनकारक नाही. परंतु, आधार कार्डधारकांसाठी ते फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे आधार कार्डला दिली गेलेली महत्त्वाची कागदपत्रं अपडेट करण्याच्या दृष्टीनं आधार कार्डधारकांकडे आग्रह केला जात आहे. असं करता येईल अपडेट यूआयएडीएआयच्या मते, आधार कार्डला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं अपडेट करता येऊ शकतं. ऑनलाइन आधार अपडेट करण्यासाठी My Aadhaar पोर्टलवर जावं लागतं. दुसरीकडे, आधारकार्डधारक आधार सेंटरवर जाऊनही हे काम करू शकतात. यासाठी त्यांना काही शुल्कही भरावं लागू शकतं. दरम्यान, यूआयएडीएआय हे घटनात्मक प्राधिकरण आहे. आधार कायदा 2016 नुसार 12 जुलै 2016 मध्ये याची भारतात स्थापना करण्यात आली. सर्व नागरिकांना ‘आधार’ची ओळख क्रमांक देण्याच्या दृष्टीने याची निर्मिती केली गेली. दरम्यान, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात केवळ एकदाच आधार नंबर दिला जातो. यूआयडीएआयच्या वतीनं हा नंबर देण्यात येतो. आधार कार्डमध्ये 12 अंकांचा एक विशिष्ट क्रमांक असतो. यामुळे संबंधित नागरिकाची माहिती मिळते. यात पत्ता, आई-वडिलांचं नाव, वय यासह इतर माहिती उपलब्ध असते. विशेष म्हणजे एखाद्या ठिकाणी आधार कार्ड देण्याची आवश्यकता असल्यास मास्क्ड आधार कार्डचा वापर करू शकता, असंही सांगितलं गेलं आहे. भारतात जन्माला आलेल्या बाळापासून अगदी वयोवृद्ध असलेल्या नागरिकाचंसुद्धा आधार कार्ड तयार करावं लागतं. जन्मलेल्या मुलाचा आधार क्रमांक त्यांच्या पालकांशी जोडला गेलेला असतो. बाळ जेव्हा 5 वर्षांपेक्षा मोठं होतं तेव्हा त्याच्या बोटाचे ठसे घेतले जातात आणि त्याला स्वतंत्र ओळख प्राप्त होते. आधार कार्डमधील चुकांकडे दुर्लक्ष न करता वेळीच महत्त्वाची कागदपत्रं देऊन ते अपडेट करून घेणंही तितकचं गरजेचं आहे.