नवी दिल्ली, 2 मार्च : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारत सरकार स्वस्तात सोन खरेदीची संधी देत आहे. 28 फेब्रुवारीपासून ही संधी ओपन झाली असून 4 मार्च रोजी बंद होणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये (Sovereign Gold Bond Scheme) सध्याच्या दराहून कमी किमतीत सोनं खरेदीची संधी आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये सोनं जवळपास दोन हजार रुपयांनी डिस्काउंटमध्ये मिळत आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी ठरू शकते. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान सोने दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केटच्या अनिश्चिततेच्या वातावरणात सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय सुरक्षित असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. भारतात सोन्याची रिटेल किंमत जवळपास 53000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. परंतु Sovereign Gold Bond Scheme मध्ये सोनं तुलनेने 2000 रुपये कमी आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम अंतर्गत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,090 रुपये आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्डसाठी ऑनलाइन अर्ज केल्यास, यात प्रति ग्रॅम 50 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. जे लोक ऑनलाइन अर्ज करतील त्यांना 50,590 प्रति 10 ग्रॅमसाठी भरावे लागतील. डिजीटल पेमेंट करणाऱ्यांना ग्राहकांना 50 रुपये प्रति ग्रॅमची अतिरिक्त सूट दिली जाते. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये इश्यू प्राईसवर दरवर्षी 2.50 टक्के निश्चित व्याज मिळतं. व्याजाचे पैसे प्रत्येक सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतात.
सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉवरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या स्किमअंतर्गत व्यक्तिगत गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब एका आर्थिक वर्षात कमीत कमी 1 ग्रॅम आणि अधिकाधिक 4 किलोग्रॅम गोल्डसाठी गुंतवणूक करू शकतात. ट्रस्ट्ससारख्या संस्था दरवर्षी 20 किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतात. गोल्ड बॉन्डची विक्री बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त शेयर बाजारांद्वारे केली जाते. बॉन्डची विक्री व्यक्तिगतरित्या, भारताचे रहिवासी (Indian Citizens), हिंदू अविभाजित परिवार (HUF), ट्रस्ट्स, विद्यापिठ आणि संस्थांना दान केली जाईल.