नवी दिल्ली, 1 एप्रिल : ग्राहकोपयोगी वस्तू (Consumer Goods) तयार करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचा (HUL) समावेश होतो. कंपनीच्या उत्पादनांमध्ये खाद्यपदार्थ, शीतपेयं, क्लिनिंग एजंट्स, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स, वॉटर प्युरिफायर आणि इतर शेकडो ग्राहकोपयोगी वस्तूंचा समावेश होतो. कंपनीनं नुकताच आपल्या काही प्रॉडक्टस् बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडनं लाइफबॉय, लक्स, पियर्स, सर्फ एक्सेल मॅटिक, कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनर, डव्ह बॉडी वॉश या ब्रँडच्या स्टॉक-कीपिंग युनिट्समधील क्लिनिंग (Cleaning) आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्सच्या (Personal Care Products) किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं CNBC-TV18 ला सांगितलं की, सध्या कंपनीवर महागाईमुळे ताण (Inflationary Pressures) आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महागाईचा ताण असूनही कंपनी पूर्ण क्षमतेनं आपली वाटचाल सुरू ठेवेल असा विश्वास कंपनीला आहे. अनेक दैनंदिन जीवनावश्यक (Daily Essential) वस्तूंच्या किमतीत वाढ (Price Hike) अपेक्षित होती. कारण, युक्रेन-रशियायुद्धामुळे (Ukraine-Russia War) कंपन्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. चलनवाढीचा हा परिणाम कमी करण्यासाठी कंपन्या विविध उपायांवर विचार करत आहेत.
याबाबत मिड कॅप्स, एंजल वन लिमिटेडचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट अमरजित मौर्य (Amarjeet Maurya) म्हणाले, ‘एचयूएल आपल्या होम प्रॉडक्ट्स सेगमेंटच्या किमतीत वाढ करत आहे. (युक्रेनच्या संकटामुळे कच्च्या मालाच्या किमती, मालवाहतूक खर्च, पॅकेजिंग खर्च वाढून जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे). हा निर्णय कंपनीच्या भवितव्यासाठी योग्य ठरेल आणि यामुळे ऑपरेटिंग मार्जिन (Operating Margin) स्थिर राहील, असा आम्हाला विश्वास आहे. सध्या आम्ही कंपनीबाबत तटस्थ आहोत.’ दोन आठवड्यांपूर्वी, हिंदुस्थान युनिलिव्हरनं साबण (Soaps), डिटर्जंटस् (Detergents) आणि डिश वॉशिंग प्रॉडक्ट्सच्या (Dish Washing Products) किमती 3 ते 10 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. त्यामध्ये सर्फ एक्सेल ईझी वॉश डिटर्जंट, सर्फ एक्सेल क्विक वॉश, विम बार आणि लिक्विड, लक्स, रेक्सोना साबण आणि पाँड्स टॅल्कम पावडर इत्यादींचा समावेश होता. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेल, पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. एचयूएलसह बहुतेक साबण उत्पादक कंपन्या साबण आणि शॅम्पू यांसारख्या (Shampoos) नॉन फूड कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या निर्मितीमध्ये पाम तेलाचा वापर करतात. साधारणपणे कंपन्या आपल्या सगळ्या उत्पादनांच्या किमतींमध्ये एकदम वाढ करत नाहीत. त्या टप्प्याटप्प्याने किमती वाढवतात.
एचयूएल ब्युटी आणि पर्सनल केअर, फूड अँड रिफ्रेशमेंट आणि हाउसहोल्ड केअर यासह विविध रेंजचे प्रॉडक्ट्स विकते. डिसेंबर (2021) तिमाहीत कंपनीच्या अंडरलाईंग व्हॉल्युम ग्रोथमध्ये 2 टक्के वाढ झाली होती तर वार्षिक विक्री 10.4 टक्क्यांनी वाढली होती. इनपुट किमतीचा दबाव कमी करण्यासाठी आणि महसुलाची वाढ दुहेरी अंकांवर नेण्यासाठी आता दरवाढ करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एचयूएलनं ब्रू कॉफी पावडरच्या (Bru Coffee Powder) किमती 3 ते 7 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. ब्रू गोल्ड कॉफी जार तीन-चार टक्क्यांनी आणि ब्रू इन्स्टंट कॉफी पाऊच 3 ते 6.66 टक्क्यांनी महागले आहेत. त्याचबरोबर ताजमहाल चहाची किंमतही 3.7 वरून 5.8 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ब्रुक बाँडच्या विविध प्रकारांच्या किमती 1.5 ते 14 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. किंमत वाढलेली प्रॉडक्टस् - - 1 किलो सर्फ एक्सेल डिटर्जंट पावडरची किंमत तीन टक्के वाढीसह 130 रुपयांवरून 134 वर गेली आहे. - 500 ग्रॅम सर्फ एक्सेल डिटर्जंट पावडरची किंमत 3 टक्क्यांनी वाढून 66 रुपयांवरून 68 रुपये झाली आहे. - 1 किलो सर्फ एक्सेल क्विक वॉश व्हेरियंटची किंमत 218 वरून 229 रुपये झाली आहे. या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. - सर्फ एक्सेलच्या किमती जानेवारीमध्ये जवळपास 17 टक्क्यांनी वाढल्या होत्या. - 1 किलो व्हील पावडरची किंमत 1.6 टक्क्यांनी वाढून 62 रुपये आणि 500 ग्रॅमची किंमत 3.2 टक्क्यांनी वाढून 32 रुपये झाली. - 10 रुपयांच्या व्हील डिटर्जंट बार किंमत तिच आहे पण आधी 10 रुपयांना 140 ग्रॅमचा बार मिळत होतो तो आता 115 ग्रॅमचाच बार मिळेल. -रिन सोप मल्टी-पॅक (250 gm×4) ची किंमत 76 वरून 84 रुपये झाली आहे. सोपच्या किंमतीमध्ये 10.5 टक्क्यांनी वाढली आहे. - जानेवारी 2022 मध्ये व्हील आणि रिनच्या किमती 3-14 टक्क्यांनी वाढल्या होत्या. -लक्स सोप मल्टी-पॅक (100 gm×4) ची किंमत 6.66 टक्क्यांनी वाढवून 160 रुपये करण्यात आली आहे. - पियर्स सोप (75 gmx3) ची किंमत 5.4 टक्क्यांनी वाढून 135 झाली आहे. - लक्स साबणाच्या किमतीत 5.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एचयूएलनं आपल्या बहुतेक प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या मंथली बजेटवर याचा थेट परिणाम दिसू शकतो.