नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या विप्रो (Wipro) चे मालक अझीम प्रेमजी (Azim Premji) यांनी यावर्षी समाजसेवेसाठी सर्वाधिक दान दिले आहे. यावर्षी कॉरपोरेट डोनेशन (Corporate Donation)चा मोठा हिस्सा पीएम केअर्स फंड (PM Cares Fund) मध्ये देखील गेला आहे. अझीम प्रेमजी यांनी 2020 या आर्थिक वर्षात दररोज 22 कोटी रुपये असे एकूण 7,904 कोटी रुपये दान केले आहेत. यानंतर ते या आर्थिक वर्षातील सर्वाधिक दान करणारे भारतीय बनले आहेत. समाजसेवेसाठी दान देण्यामध्ये त्यांनी HCL टेक्नोलॉजीचे मालक शिव नाडर (Shiv Nadar) यांना मागे टाकले आहे. देशात सर्वाधिक दान करणाऱ्या दानशुरांची यादी हुरून इंडिया (Hurun India) आणि Edelgive फाउंडेशन यांनी मिळून बनवली आहे. अझीम प्रेमजी यांनी दान केलेली रक्कम गेल्या वर्षींच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे. HCLचे शिव नाडर दुसऱ्या स्थानावर दान देणाऱ्यांच्या या यादीमध्ये अझीम प्रेमजी यांच्यानंतर HCL Technologies चे मालक शिव नाडर यांचा क्रमांक आहे. शिव नाडर यांनी आर्थिक वर्ष 2020 मध्ये 795 कोटी रुपयांचे दान दिले आहे. याआधीच्या वर्षी त्यांनी 826 कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले होते. 2019 या आर्थिक वर्षात शिव नाडर यांनी सर्वाधिक दान केले होते. 2019 मधे अझीम प्रेमजी यांनी 426 कोटी रुपये दान केले होते. RIL चेअरमन मुकेश अंबानी तिसऱ्या स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी 2020 या आर्थिक वर्षात 458 कोटींचे दान केले आहे. गेल्या वर्षी त्यांनी 402 कोटींचे दान केले होते. या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि पाचव्या स्थानावर वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल आहेत. 10 कोटींपेक्षा जास्त दान देणाऱ्यांची संख्या 78 यावर्षी कॉरपोरेट डोनेशन (Corporate Donation)चा सर्वाधिक हिस्सा पीएम केअर्स फंड (PM Cares Fund) मध्ये देखील गेला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 500 कोटी तर आदित्य बिर्ला ग्रुपने 400 कोटींचे डोनेशन दिले आहे. पीएम केअर्स फंडमध्ये टाटा ग्रुपने दान केलेली एकूण रक्कम 500 कोटी आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सर्वाधित 1500 कोटींचे दान टाटा सन्सने (Tata Sons) दिले आहे. तर अझीम प्रेमजी यांनी 1125 कोटी आणि मुकेश अंबानी यांनी 510 कोटींचे दान दिले आहे. यावर्षी 10 कोटींपेक्षा जास्त दान देणाऱ्यांची संख्या वाढून 78 झाली आहे. गेल्यावर्षी ही संख्या 72 होती.