नवी दिल्ली, 9 मार्च : रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia-Ukraine War) सोने दरात परिणाम होत आहे. आज सोने दरात मागील दीड वर्षातील सर्वोच्च वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) बुधवारी सोन्याचा भाव (Gold Price Today) 55 हजार पार गेला आहे. रशियावर अमेरिका आणि इतर सहयोगी देशांच्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत पिवळ्या धातूच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याचा वायदे भाव (Gold Future) 1.64 टक्क्यांच्या वाढीसह 55,111 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. हा दर मागील दीड वर्षातील सर्वोच्च दर आहे. चांदीचा वायदे भावदेखील वधारला आहे. चांदीच्या वायदे दरात 2.19 टक्क्यांची वाढीसह चांदीचा भाव (Silver Price Today) 72,950 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. 56,580 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो भाव - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफा बाजारात सोन्याच्या किमती पुढील काही दिवसांत 56 हजारांवर पोहोचू शकतात. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेदरम्यान सोन्याचा दर 55 हजार पार गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,035.97 स्तराहून अधिक ट्रेड झाल्यास भारतीय बाजारात किमती 56,580 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. रशिया-युक्रेन संकटामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होतो आहे. भारतासह अनेक देशात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड बॅक्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) SPDR Gold Trust ची सोन्याची होल्डिंग वाढून 1,067.3 टन झाली आहे, ही मार्च 2021 नंतरची सर्वाधिक आहे. रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine conflict) वाढत्या तणावामुळे सोने दरावर पुढे मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचं चित्र आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.