मुंबई, 13 ऑक्टोबर : भारत हा एक विकसनशील देश आहे. प्रामुख्याने शेतीवर आधारित असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेत आता हळूहळू इतर क्षेत्रांचंही आर्थिक योगदान वाढत आहे. देशातील नागरिक आर्थिकदृष्ट्या साक्षर झाले आहेत. यामध्ये बँकिंग क्षेत्राचं मोठं योगदान आहे. देशाच्या खेडोपाड्यात पोहचलेल्या बँकांच्या जाळ्यामुळे जनतेला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यात यश मिळालं आहे. एकूणच काय तर इटालियन मूळ असलेला ‘बँक’ हा शब्द आता भारतातील घराघरात पोहचला आहे. बँक हा शब्द पहिल्यांदा 1157 मध्ये वापरला गेला होता. तेव्हा ‘बँक ऑफ बेनिस’ची स्थापना झाली होती. त्यानंतर हा शब्द आणि बँक ही संकल्पना जगभरात पोहोचली. सध्या प्रत्येक घरातील निदान एका व्यक्तीचं तरी बँकेत अकाउंट आहे. बँकेचे व्यवहार करताना, भारतातील पहिली बँक कोणती होती हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आता बँकिंग क्षेत्रात नवीन उच्चांक गाठणाऱ्या भारतामध्ये 1770 मध्ये पहिल्या बँकेची सुरुवात झाली होती. बँक ऑफ हिंदोस्तान (Bank Of Hindostan) असं या बँकेचं नाव होतं. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अशी झाली सुरुवात अलेक्झांडर अँड कंपनीनं 1770 मध्ये ‘बँक ऑफ हिंदोस्तान’ या नावानं भारतातील पहिली बँक सुरू केली होती. ही कंपनी एक इंग्लिश एजन्सी होती, जी कोलकात्यात कार्यरत होती. या एजन्सीनं जवळजवळ 50 वर्षे यशस्वीपणे बँक चालवली. त्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती ढासळू लागली. बँकेची मूळ कंपनी असलेली मेसर्स अलेक्झांडर अँड कंपनी 1832 मध्ये मोठ्या आर्थिक संकटात सापडली. त्यामुळे कंपनीच्या इतर व्हेंचर्ससह भारतातील बँकही बंद पडली. मात्र, बँक ऑफ हिंदोस्तान बंद होण्यापूर्वी भारतात आणखी एक बँक अस्तित्त्वात आली होती. ‘बँक ऑफ इंडिया’ नाव असलेल्या या बँकेची स्थापना1786 मध्ये झाली होती. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत जुनी बँक मानली जाते. घर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी तपासा, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ स्वातंत्र्यापूर्वीच एसबीआयचा पाया 1832 मध्ये ‘बँक ऑफ हिंदोस्तान’ बंद पडली. मात्र, त्या पूर्वी भारतात बँकिंग क्षेत्राची पाळंमुळं रुजली होती. भारतातील पहिली बँक बंद होण्यापूर्वी ब्रिटिश काळात 2 जून 1806 रोजी भारतातील सर्वांत मोठ्या बँकेची पायाभरणी झाली होती. 1806 मध्ये ‘बँक ऑफ कलकत्ता’ची स्थापना झाली. स्थापनेनंतर तीन वर्षांत बँकेनं चार्टर मिळवला. 2 जानेवारी 1809 मध्ये बँकेचं ‘बँक ऑफ बंगाल’ (Bank of Bengal) असं नामांतर करण्यात आलं. हीच बँक ऑफ बंगाल आता ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) नावानं ओळखली जाते. एसबीआय ही देशातील सर्वांत मोठी बँक आहे. ‘बँक ऑफ बंगाल’ ही एक अद्वितीय संस्था मानली जात होती. कारण, बंगाल सरकारचं पाठबळ असलेली ब्रिटिश भारतातील ही पहिली संयुक्त स्टॉक बँक होती. हळूहळू या बँकेचा विस्तार झाला. या दरम्यान, 15 एप्रिल 1840 रोजी मुंबईत ‘बँक ऑफ बॉम्बे’ची स्थापना झाली. तर, 1 जुलै 1843 रोजी मद्रासमध्ये (चेन्नई) ‘बँक ऑफ मद्रास’ची स्थापना झाली. 27 जानेवारी 1921 रोजी मुंबई आणि मद्रास येथील बँकांचं बँक ऑफ बंगालमध्ये विलीनकरण झालं आणि ‘इम्पिरियल बँक ऑफ इंडिया’चा उदय झाला. फक्त 50 रुपयांत इथे मिळतोय आकाशकंदील, विश्वास बसत नाही पाहा VIDEO देश स्वतंत्र होईपर्यंत इम्पिरियल बँक अस्तित्वात राहिली. 1955 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) संसदीय कायद्यानुसार इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं अधिग्रहण केलं. यासाठी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट 1955’ लागू करण्यात आला. 30 एप्रिल 1955 रोजी इम्पिरियल बँकेचं नाव बदलून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ करण्यात आलं. 2017 मध्ये देशातील अनेक बँकांचं एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आलं आणि ती देशातील सर्वांत मोठी बँक ठरली. पहिली कमर्शियल बँक! सध्या देशात अनेक कमर्शियल बँका आहेत. याचाही पाया स्वातंत्र्यापूर्वीच रचला गेला होता.1881 मध्ये फैजाबाद येथे ‘अवध कमर्शियल बँक’नावानं देशातील पहिल्या कमर्शियल बँकेची स्थापन झाली होती. विशेष म्हणजे या बँकेचं संचालक मंडळ पूर्णपणे भारतीय होतं.