सायबर क्राइम
ठाणे, 20 जून : गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राइमच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांची फसवणूक करुन त्यांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील. मात्र आता गुन्हेगारांनी ठाण्यामधील ‘पेमेंट गेट वे’ चे काम करणाऱ्या एका कंपनीच्या बँक अकाउंटमधून पैसे पळवले आहेत. गुन्हेगारांनी बँक अकाउंटमध्ये याच कंपनीच्या चार मर्चंट कंपनीच्या आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून अनिधिकृत प्रवेश केला. यानंतर त्यांनी तब्बल 25 कोटी रुपये 100 पेक्षा जास्त बँक अकाउंटमध्ये वळवले आहेत. या सायबर अटॅक प्रकरणी ठाण्यामधील श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या 25 कोटींपैकी काही रक्कम ही थांबवण्यात आल्याची माहिती सायब पोलिसांकडून मिळाली. आता हा सायबर अटॅक नेमका कोणी केलाय याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. Fraud Case: 200 रुपयांच्या नादात महिलेला 6 लाखांचा चुना! पेटीएम वापरता मग ‘हे’ अवश्य वाचा ‘पेमेंट गेट वे’ म्हणून काम करणाऱ्या या कंपनीचे वागळे इस्टेटमध्ये कार्यालय आहे. या कंपनीमार्फत विविध व्यावसायिक कंपन्यांना सेवा दिली जाते. या कंपनीकडे ३००पेक्षा जास्त मर्चंट नोंदणीकृत आहेत. मात्र, एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये कंपनीची यंत्रणा लक्ष्य करून डेटाबेसमध्ये बदल केल्याचे समोर आले. अनेक फसवे व्यवहार केल्याचेही आढळले. पोर्टलवर तीन व्यवहार करून निधी हस्तांतरित केल्याची बाब स्पष्ट झाली. डेटाबेसमधून संशयास्पद व्यवहारांची माहिती हटवली गेली. पुन्हा एप्रिलमध्येच सायबर हल्लेखोरांनी यंत्रणेला लक्ष्य केल्याची बाब कंपनीच्या लक्षात आली. सायबर हल्लेखोरांनी याच कंपनीच्या चार मर्चंट कंपनीच्या आयपीद्वारे कंपनीच्या बँक खात्यामध्ये अनधिकृत प्रवेश करत या खात्यामधील कोट्यवधी रुपये विविध बँक खात्यांमध्ये वळते केले. ही रक्कम २५ कोटींपेक्षा जास्त आहे. ऑनलाइन फसवणुकीसाठी सायबर हल्लेखोरांनी बनावट आयपी अॅड्रेस वापरल्याची बाब समोर आली आहे. ऑनलाइन फसवणुकीसाठी सायबर ठग वापरताएत हे नवीन मार्ग, असा कराल बचाव कंपनीच्या तक्रारीत काय म्हटलंय? या घटनेनंतर कंपनीने पोलिसात धाव घेतली. कंपनीने म्हटलंय की, फसवणुकीचा हा प्रकार 14 ते 22 एप्रिलदरम्यान घडला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याने याबाबत तक्रार दिली. यानंतर सायबर गुन्हेगारांविरोधात श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. तेव्हा 25 कोटींपैकी पाच कोटी रुपये तांबवले आहेत. ज्या बँक अकाउंट्समध्ये हे पैसे गेले आहेत. त्या बँक खातेधारकांची चौकशी पोलिसांकडून केली जातेय. सायबर अटॅकचा वाढता धोका गेल्या काही दिवसांपासून सायबर अटॅकच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑनलाइन ट्रांझेक्शन वाढले असल्याने हे धोके देखील वाढत आहेत. मोठ्या कंपनीला एवढा मोठा फटका बसल्यानंतर हे हल्ले कधी थांबणार असा प्रश्न देखील निर्माण होतोय. काही वर्षांपूर्वी पुण्यामधील एका प्रसिद्ध बँकेवर देखील सायबर अटॅक झाला होता. यावेळी गुन्हेगारांकडून सर्व्हर हॅक करण्यात आलं होतं. तसंच 94 कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आला होता. गेल्या वर्षी ठाण्यामधील एका सहकारी बँकेवरही असाच हल्ला झाला होता. आता पुन्हा एकदा तशी घटना घडली आहे. यामुळे भीती निर्माण झालीये.