नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : चीन, दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना व्हायरसचा झालेला फैलाव हा जगभरासाठीच चिंतेचा विषय आहे. या व्हायरसने साथीच्या रोगाचं रूप धारण केलं तर ही आरोग्याची समस्या आणखी तीव्र होऊ शकते. याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवरच होऊ शकतो. मूडीज अॅनॅलिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झंडी यांनी जागतिक मंदीबद्दल (Global-Recession) हा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव चीन आणि कोरियासोबत इटलीमध्येही होतोय. त्यामुळे त्याचा आणखी फैलाव होण्याचा धोका आहे. त्याचा परिणाम पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. कोरोना व्हायरसचं अधिकृत नाव कोविड - 19 असं आहे. याची सुरुवात डिसेंबर महिन्यात 2019 मध्ये चीनमधल्या वुहान प्रांतात झाली. कोरोना व्हायरसचा परिणाम मूडीज अॅनॅलिटिक्सच्या तज्ज्ञांच्या मते, कोविड - 19 व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला अनेक प्रकारे फटका बसू शकतो. चीनच्या उत्पादन क्षेत्रावर आणि अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झालाय. व्यापाराच्या उद्देशाने आणि पर्यटनाच्या उद्देशाने चीनला जाणाऱ्यांचं प्रमाण खूपच कमी झालंय. जगभरातल्या एअरलाइन कंपन्यांनी चीनकडे जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. चीनमधून विविध देशांत जाणाऱ्या लोकांची संख्याही कमी झाली आहे. चीनमधून दरवर्षी 30 लाख पर्यटक अमेरिकेला जातात. मूडीजने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये चिनी पर्यटकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. युरोपच्या प्रवासावरही याचा परिणाम झालाय.
कारखाने बंद, उत्पादन घटलं कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये गेले काही दिवस कारखाने बंद आहेत. यामुळे उत्पादन खूपच कमी झालंय. अॅपल, नायके, जनरल मोटर्स अशा अमेरिकी कंपन्यांना याचा मोठा फटका बसला आहे. चीनमध्ये मागणी घटल्याने अमेरिकी निर्यातही कमी होईल. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापार करारानुसार चीनमध्ये अमेरिकेची निर्यात वाढवण्याचा मानस होता पण आता या व्यापारालाही धक्का बसलाय, असं मूडीजच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितलं. ==============================================================================