नवी दिल्ली, 07 मे : जर लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) अशाच पद्धतीने वाढत राहिला तर येणाऱ्या काळात मीठाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार देशाच्या किनारपट्टी भागात मीठाचे उत्पादन घेणाऱ्या लोकांचे म्हणणे असे आहे की, मीठाचे उत्पादन कमी झाले आहे. कारण कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे याठिकाणी काम करणारे मजूर घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजूरांसाठी सरकारने खास श्रमिक ट्रेन्स चालवल्या, जेणेकरून हे मजूर आपापल्या घरी पोहोचतील. मजूरांच्या कमतरतेमुळे मीठाचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. लवकरच याचा परिणाम मीठाच्या पुरवठ्यावर देखील दिसण्याची शक्यता आहे. (हे वाचा- ‘या’ सरकारी बँकेत एफडी केली असाल तर होणार नुकसान, वाचा काय आहे कारण ) मीठ बनवण्याची प्रक्रिया ऑक्टोबर ते जून या कालावधी दरम्यान केली जाते. तर सर्वात जास्त उत्पादन मार्च आणि एप्रिल महिन्यात होते. देशात तयार होणाऱ्या मीठापैकी 95 टक्के मीठाचे उत्पादन गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये होते. उर्वरित उत्पादन महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये होते. दरवर्षी भारतामध्ये 200 ते 250 लाख किलो मीठाचे उत्पादन केले जाते. (हे वाचा- तब्बल 40 दिवसानंतर Maruti Suzuki ने विकल्या 50 गाड्या, 25 मार्चपासून होती विक्री ) इकोनॉमिक टाइम्स ला इंडियन सॉल्ट मॅन्यूफॅक्सर्स असोसिएशन (ISMA)चे प्रेसिडेंट भरत रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्धा मार्च महिना आणि पूर्ण एप्रिल महिना असाच निघून गेला. ज्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक उत्पादन होते. मीठाच्या उत्पादनामध्ये उन्हाळ्यातील एका महिन्यात झालेले नुकसान इतर इंडस्ट्रीमध्ये झालेल्या 4 महिन्याच्या नुकसाना एवढे असते, असंही ते म्हणाले. या नुकसानाची भरपाई होईल की नाही हे देखील ठावूक नाही तसंच आता आमच्याकडे केवळ 45 दिवस असून मीठ उत्पादनाचे सायकल 60 ते 80 दिवसांचे असते, अशी माहिती रावल यांनी दिली आहे. मीठ पुरवठा कमी होण्याची कारणे रावल पुढे म्हणाले की, ‘पुढील काही दिवसात आमचे उत्पादन नाही वाढले तर प्रसंग कठीण होईल. कारण आमचा ऑफ सीजन (पावसाळा) बफर स्टॉक एवढा जास्त नाही आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन संपल्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा मीठाची मागणी वाढेल.’ त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जर पाऊस उशीरा झाला तरच मीठ उत्पादन सामान्य स्तरावर येईल. संपादन - जान्हवी भाटकर