Share Market: शेअर बाजारात गुंतवणूक करताना टाळा ‘या’ चुका, सेबी प्रमुखांनी दिला महत्त्वाचा सल्ला
मुंबई, 30 ऑक्टोबर: शेअर बाजारात पैसे गुंतवून झटपट श्रीमंत होता येतं किंवा यात गुंतवणूक करणं म्हणजे क्षणार्धात कंगाल होण्याची वेळ येऊ शकते, असे दोन भिन्न मतप्रवाह समाजात पाहायला मिळतात. असं असलं तरी टीव्ही, वर्तमानपत्रं किंवा सोशल मीडियावर शेअर बाजाराबद्दल जाणून घेत यात नशीब आजमावणारे बरेच लोक आहेत. पण बाजारात पैसे गुंतवताना सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चुका टाळल्या पाहिजेत. कष्टाचा पैसा बाजारात लावताना याची परिपूर्ण माहिती करून घेणं व याबद्दल ज्ञान मिळवणं फार गरजेचं असतं. भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात, SEBI च्या प्रमुख माधवी पुरी बुच यांनीही शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय. सद्यस्थितीत डी-मॅट अकाउंट उघडून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. यात दिवसेंदिवस वाढ नोंदवली जात आहे. उत्तम परतावा मिळतो म्हणून आयुष्यभर जमवलेले पैसेही यात टाकणारे अनेकजण पाहायला मिळतात. परंतु असे करताना बाजारातील चढ-उताराचा फारसा विचार केला जात नाही. वास्तविक पाहता शेअर बाजारात उतरताना याचे फायदे-तोटे लक्षात घ्यायला हवेत. विशेषत: तरुण गुंतवणूकदार अनेकदा काही सामान्य चुका करतात त्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावं लागतं. गुंतवणुकदाराने काही मुलभूत गोष्टी शिकून सामान्यपणे होणाऱ्या चुका टाळणं गरजेचं असतं. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या मते, शेअर बाजाराची स्थिती पाहून गुंतवणूक न करता सेबीच्या नोंदणीकृत मध्यस्थांमार्फत व्यवहार केला गेला पाहिजे. गुंतवणूक करताना बाजाराच्या आधीच्या परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यातील अंदाज बांधत गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. हेही वाचा: जॅकपॉट! या शेअरनं दिला रेकॉर्ड ब्रेक रिटर्न, केवळ 9 हजारांच्या गुंतवणूकीचे झाले एक कोटी आर्थिक उद्दिष्ट समोर ठेवून उत्पादने निवडावीत गुंतवणुकदारांनी स्वत:चं आर्थिक नियोजन म्हणजेच फायनॅन्शियल प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. आपलं आर्थिक उद्दिष्ट काय आहे, याचा अभ्यास करून त्याला अनुरूप उत्पादनांची म्हणजेच फायनॅन्शियल प्रॉडक्टची निवड करायला हवी, असं सेबी प्रमुखांनी म्हटलं आहे. गुंतवणुकीचे धोरण हवे- यंदा इंटरनॅशनल सिक्युरिटीज कमिशन ऑर्गेनायझेशनच्या वतीनं 10 ऑक्टोबर रोजी जागतिक गुंतवणूक सप्ताह म्हणजेच वर्ल्ड इन्व्हेस्टर वीकला सुरुवात झाली. 16 तारखेपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सेबीच्या वेबसाइटवर बुच यांनी एक संदेश दिलाय. यात त्यांनी मुलभूत गोष्टींवर भर दिला आहे. नियमित बचत आणि विविधता असलेल्या पोर्टफोलियोत नेहमी गुंतवणुकीवर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं मत त्यांनी मांडलं आहे.
दरम्यान, शेअर बाजारात पैसा गुंतवून अल्पावधीत श्रीमंत कसे होता येते किंवा भरमसाठ परतावा कसा मिळवता येतो यावर असंख्य जाहिराती सुरू असतात. यात असंख्य उदाहरणं देऊन सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलं जातं. पण शेअर बाजारात गुंतवणूक करताना शेअर बाजारातील चढ-उतार आणि आपण स्वत: किती तोटा सहन करू शकतो याची क्षमता जाणून घेणं गरजेचं आहे. तसंच सेबी प्रमुखांनी म्हटल्याप्रमाणं नोंदणीकृत मध्यस्थांमार्फत व्यवहार केला गेल्यास निश्चितच तोटा होण्याची शक्यता खूप कमी होईल.