मुंबई, 22 मार्च : वेदांत रिसोर्सेसचे लिमिटेडचे संस्थापक आणि चेअरमन अनिल अग्रवाल यांनी कोरोनाग्रस्तांना मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी दोन हात करण्यासाठी मदत म्हणून उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी मदत करणार असल्याचं आश्वासन केलं आहे. #DeshKiZarooratonKeLiye असा हॅशटॅग वापरत त्यांनी हे ट्वीट केलं आहे. ‘यावेळी आपल्या देशाला आपली गरज आहे. खूप लोकांना य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ज्यांना दिवसाच्या कामानुसार मजुरी मिळते त्यांची अधिक चिंता आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मदत करू’ असं ट्वीट त्यांनी केले आहे.
अनिल अग्रवाल यांनी देऊ केलेली मदत अनेकांच्या फायद्याची ठरू शकते. सध्या देशामध्ये कोरोनामुळे तणावाचे वातावरण आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारं ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्ना करत असले, तरी देशातील महत्त्वाचे उद्योगपती याबाबतीत मदतीचा हात पुढे करत आहेत. अनिल अग्रवाल यांच्या आधी महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी देखील मोठी मदत कोरोनाग्रस्तांसाठी केली आहे. त्यांनी व्हेंटिलेटर बनवण्याचा त्याचप्रमाणे आपला संपूर्ण पगार मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. (संबधित- कौतुकास्पद! कोरोनाला हरवण्यासाठी आनंद महिंद्रांनी सरकारला दिला स्वत:चा पगार ) भारतामध्ये कोरोनाचं संक्रमण न थांबल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेतच, पण त्याबरोबरच सरकारला सर्वांच्याच सहकार्याची गरज आहे. त्याचप्रकारे आपण कोरोनाला हरवू शकतो.