एकदोन नाही तर तब्बल 700 वेगवेगळ्या फळांची बाग
बंगळुरू, 19 डिसेंबर : बाग म्हटलं की आपल्याला विविध झाडांचा वा एकाच प्रकारच्या झाडांचा मोठा समूह मनात येतो. उदा. आंब्यांची बाग, पेरुची बाग, द्राक्ष बाग इत्यादी. पण 700 प्रकारच्या विविध फळांच्या झाडांची बाग आहे, हे म्हटलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार का? नाही ना. पण हे खरं आहे. कर्नाटक राज्यात अशी एक बाग आहे. या बागेत तुम्हाला 700 फळांची झाडं व त्यातही वेगवेगळ्या फळांच्या जवळपास 40 व्हरायटी पहायला मिळतात. या व्हराटींची विषेशता म्हणजे त्या भारताबाहेरच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या बागेविषयी व त्यातून होणाऱ्या कमाई विषयी. ही बाग कर्नाटकमध्ये असून, अनिल बलांजा हे त्या बागेचे मालक आहेत. मागील 20 वर्षांपासून ते या बागेत फळांचं उत्पादन घेतात. या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे 700 प्रकारची वेगवेगळी फळं पिकतात. त्यापासून त्यांना कमाईदेखील चांगली होते. या बागेत इतक्या प्रकारची फळांची लागवड करण्याचा एक मोठा प्रवास आहे. त्यामागे अनिल बलांजा यांचे मोठे कष्ट, आवड व नियोजन आहे. भारताबाहेरील वेगवेगळ्या फळांचं वाण जमवणं हे काही सोपं काम नव्हतं, त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. ज्या देशात आपले मित्र आहेत, तिथून आपल्या मित्रांच्या मदतीने तर ज्या ठिकाणी आपले मित्र नाहीत त्या देशातील एखाद्या नर्सरीशी संपर्क साधून त्यांनी त्या देशातील फळांचे वाण मिळवलं. असं करतकरत आज त्यांनी 1-2 नाही तर तब्बल 700 फळांची बाग फुलवली आहे. विशेष म्हणजे एका फळाच्या अनेक व्हरायटी तिथे पहायला मिळतात. या बागेत मलेशियापासून ब्राझीलपर्यंत मिळणारी फळं उपलब्ध आहेत. वाचा - दुसरी मुंबई ओळख असणाऱ्या गावात पांढऱ्या सोन्यामुळे शेतकरी कंगाल अनिल बलांजा यांची ही बाग कर्नाटकातील दक्षिण कन्नड या जिल्हात आहे. अनिल यांचे वडील एकेकाळी फणस आणि आंबा पिकवायचे. नंतर अनिल बलांजा यांनी शेतीवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर त्यांनी सुपारी, नारळ आणि रबराची लागवड सुरू केली. पण सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांचं आयुष्यच बदललं. त्यांनी आपल्या बागेत जगातील विविध देशांतील फळं पिकवायचं ठरवलं. अनिल बलांजा यांच्या बागेत अॅव्होकॅडो, संतोल, केपल, आंबा, फणस, लिंबू, पेरू, जांभूळ, लोंगण, मप्रांग, जाबोटिबा, पुलासन, ड्युरियन, केम्पडेक आणि ब्रिबिया ही फळं घेतली जातात. ही फळं मलेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, ब्राझील, थायलंड, इंडोनेशिया व चीन अशा सुमारे 40 देशांतील आहेत.
अनिल यांची बाग जवळपास 30 एकर जमिनीवर पसरलेली आहे. यात ते फळांचं क्राफ्टिंग करतात. त्यांची मुख्य कमाई ही फळांच्या चांगल्या पिकातून होते. पश्चिम बंगालपासून हिमाचल प्रदेशापर्यंतचे शेतकरी हे त्यांचे ग्राहक आहेत. ते ह्या शेतकऱ्यांना फळांची रोपं विकूनही कमाई करतात. तसंच जैविक खत बनवणं हादेखील त्यांच्या व्यवसायाचा एक भाग आहे. या व्यवसायातून त्यांना महिन्याला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं.