अहमदनगर, 28 जून: यंदाचे वर्ष हे जगभरात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जातेय. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी तृणधान्यांच्या संवर्धनाचे काम होतेय. अहमदनगर जिल्ह्यातील जहागीरदार वाडीचे बाळू घोडे हे काम करीत असून मिलेट मॅन अशीच त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे घोडे हे परिसारतील शेतकऱ्यांनाही भरड संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. सह्याद्रीतील वनस्पतींच्या अभ्यासाचा छंद अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बाळू घोडे राहातात. अगोदर ते पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय करायचे. जोडधंदा म्हणून कळसुबाई गडावर नारळ विक्रीसाठी त्यांच्या फेऱ्या व्हायच्या. मात्र सन 2010 नंतर त्यांच्यामध्ये बदल झाला. जंगलात फिरता फिरता जंगली वनस्पतींचा ते अभ्यास करु लागले. यातून काही औषधी वनस्पती आहे का? याचीही चाचपणी त्यांनी केली. जंगलात सापडलेल्या औषधी वनस्पतींचा उपयोग कसा करता येतो, याचीही माहीती बाळू वयस्कर व्यक्तींकडून मिळवू लागले.
रानभाज्यांची आवड आणि बियांचे संवर्धन बाळू यांना रानभाज्यांची आवड होती. त्यामुळे त्यांनी विविध रानभाज्यांबाबत माहिती घेतली. त्या पिकवण्याची पद्धत जाणून घेतली. पत्नी विमल यांच्या मदतीने ते रोज वेगवेगळ्या रानभाज्यांचा वापर आपल्या आहारात करु लागले. सध्या त्यांच्याकडे 60 ते 70 रानभाज्यांची माहिती उपलब्ध आहे. ऋतुमानानुसार विविध प्रकारच्या भाज्या पिकवत असल्याचे त्यांनी सांगितले. 10 वर्षांपासून सुरू आहे मिलेट्स बँक यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होतेय. यात विशेष करुन भरड धान्यांचा बोलबाला जास्त आहे. परंतु बाळू यांच्या घरी मात्र गत 10 वर्षांपासून मिलेट्स बँक सुरु आहे. मिलेट्स म्हणजेच भरडधान्य होय. यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरई, भादली, सावा, राळा अशा वाणांचा समावेश होतो. बाळू यांना साडेचार एकर शेती असून तीही चढ उताराची आहे. या शेतीमध्ये कमी पाण्यावर तग धरणारी पिके ते घेतात. तसेच परराज्यातील भरडधान्यांचे वाणही ते शेतात पीकवत आहेत. Inspiring Story: बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी कशा प्रकारे तयार केली 250 वाणांची बँक? मिलेट मॅन अशीच ओळख बाळू घोडे यांनी तृणधान्यांच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम आणि कृषी प्रदर्शनात सहभागी होतात. या कामात त्यांना बायफ आणि कृषी विभागाचीही मदत मिळतेय. त्यांनी एक मिलेट कलश तयार केला आहे. सध्या तृणधान्यांशी संबंधित विविध कार्यक्रम आणि प्रदर्शनात हा मिलेट कलश सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. त्यांच्या तृणधान्य संवर्धनाच्या कामामुळेच त्यांना मिलेट मॅन म्हणूनच ओळखलं जातंय.