सुदर्शन कैलास कानवडे अहमदनगर,16 जून : शेतीतून चांगले उत्पन्न व्हावे यासाठी शेतकरी अनेक नवनवीन प्रयोग करत असतात. या प्रयत्नातून ते कधी अपयशी ठरतात, तर कधी यशस्वी देखील होत असतात. असाच एक प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बाळासाहेब वाळुंज यांनी केला आहे. त्यांनी आपल्या शेतात आवळ्याची लागवड केली असून आवळा शेतीचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे. कशी झाली सुरुवात? अहमदनगर जिल्ह्यातील अकोले हे 59 वर्षीय बाळासाहेब वाळुंज यांचे गाव आहे. साल 2000 मध्ये बाळासाहेब वाळुंज यांनी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये आवळ्याच्या 600 झाडांची लागवड केली होती. 2007 पासून त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. मात्र बाजारपेठांमध्ये आवळ्याला समाधानकारक भाव मिळत नव्हता. त्यामुळे बाळासाहेब हे आवळ्यावर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादने बनविण्याचा विचार करत होते.
घरीच उत्पादने बनविण्यास सुरुवात राहुरी कृषी विद्यापीठातून बाळासाहेब वाळुंज यांनी आवळ्यावर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण प्राप्त केले आणि घरीच उत्पादने बनविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना या व्यवसायात अनेक अडचणी आल्या मात्र त्यांनी खचून न जाता आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि अमृत रस, आवळा कँडी, सस् पिकल्स यांसारखे विविध आरोग्यदायी पदार्थ बनविले. कालांतराने त्यांच्या या घरगुती पदार्थांना ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळाली. त्यांना यामधून वर्षाकाठी चार ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न मिळते, असं बाळासाहेब वाळुंज सांगतात.
Wardha News: खासगी नोकरी सोडली अन् लावली आमराई, आता लाखोंची करतो कमाई, Video
घरगुती स्वरूपात विक्री आपल्या चार एकर क्षेत्रातून निघणाऱ्या आवळ्याचे उत्पादन वाळुंज हे केवळ घरगुती स्वरूपातच विकतात. ग्राहकांचा विश्वास संपादित केल्यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांची चांगलीच ओढ दिसून येते. बाळासाहेब वाळुंज यांच्या पत्नी त्यांना या व्यवसायात मदत करतात. पतीच्या खांद्याला खांदा लावून 23 वर्षांचा हा यशस्वी प्रवास त्यांनी अविरतपणे सुरू ठेवला आहे.