नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) यंदाची होळी (Holi 2022) चांगलीच आनंदाची ठरणार आहे. कारण मार्च महिन्यात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीची मोठी भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ करण्याची घोषणा सरकार करणार असल्याची चर्चा आहे. सध्या महागाई भत्ता (DA) 31टक्के आहे, तो 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. केंद्र सरकार घरभाडे भत्ता (Housing Rental Allowance) वाढवण्याबाबतही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही मीडिया अहवालांनी याबाबत वृत्त दिले आहे, मात्र सरकारतर्फे अद्याप याबाबतीत काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईज इंडेक्सच्या (All India Consumer Price Index- APCPI) घोषणेनंतर महागाई भत्ता वाढीची घोषणा होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हे वाचा- OMG! 99,999 रुपयांना चहाची विक्री, या ‘स्पेशल टी’साठी ‘Golden’ दिवस वाढत्या महागाईसोबत पगार वाढ (Salary Hike) होणंही गरजेचं असतं. त्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतन धारकांनाही (Pensioners) महागाई भत्ता देतं. मूळ पगारावर महागाई भत्ता मोजला जातो. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात सुधारणा करते. शहरांच्या दर्जानुसार महागाई भत्त्याचे प्रमाण निश्चित केलेलं असतं. तसंच घरभाडं भत्ताही शहराच्या गटानुसार दिला जातो. महानगर अर्थात अ गटातील शहर असेल तर 24 टक्के घरभाडे भत्ता मिळतो. तर त्याहून लहान म्हणजे ब गटातील शहर असेल तर 16 टक्के आणि निमशहर म्हणजे क गटातील शहर असेल तर 8 टक्के घरभाडे भत्ता मिळतो. प्रत्येक स्तरानुसार कर्मचाऱ्यांचा पगार आणि महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ वेगळी असते. मूळ पगारावर मिळणारा महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण पगार वाढतो. हे वाचा- Zomato शेअरमधील घसरण सुरुच, आज 6 टक्के खाली; शेअर इश्यू प्राईजच्या खाली केंद्र सरकारनं यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये 3 टक्के महागाई भत्ता वाढवला होता. पूर्वलक्ष्यी प्रभावाने एक जुलैपासून ही वाढ देण्यात आली होती. त्यामुळे सध्याचा महागाई भत्त्याचा दर 31 टक्के आहे. यात आणखी 3 टक्क्यांची वाढ केल्यास तो 34 टक्के होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. याचा फायदा 48 लाख कर्मचारी आणि 69 लाख निवृत्ती वेतन धारकांना होणार आहे. महागाई भत्ता वाढण्याच्या चर्चेमुळे केंद्रसरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची ही मागणी प्रलंबित होती, ती आता होळीच्या मुहूर्तावर पूर्ण होण्याची शक्यता असल्यानं सणाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.