या शहरांमध्येही मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा
मुंबई : दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 5G सेवेचा शुभारंभ केला आहे. १३ शहरांमध्ये या सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. या सेवेमुळे देशात मोठी डिजिटल क्रांती घडून आली आहे. आता आपलं आयुष्य १० पटीने सुपरफास्ट चालणार आहे. सेवांपासून ते सुविधांपर्यंत आणि हातातील फोनपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत अनेक गोष्टी सुपरफास्ट होतील. याचा तुमच्या आमच्या आयुष्यावर कसा परिणाम होणार आपलं आयुष्य कसं ३६० डिग्रीमध्ये चेंज होऊ शकतं जाणून घेऊया. 5G मोबाइल सेवेचा वेग आणि क्षमता 4G मोबाइल सेवेपेक्षा सुमारे 10 पट जास्त असेल. 5G मुळे व्यवसाय आणि स्टार्टअपला चालना मिळेल. ऑटोमेशन वाढेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलं 5G तुमच्या मोबाईलमध्ये चालणार का? असं करा चेकआतापर्यंत ज्या गोष्टी मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या त्या खेड्यापाड्यात पोहोचतील. ई-औषध, शिक्षण, कृषी क्षेत्र यांचा मोठा फायदा होईल. रोबोटिक्सच्या तंत्रज्ञानाला अधिक चालना मिळेल. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल. ई-गव्हर्नन्सचा विस्तार होईल. 5G आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल. ई-कॉमर्स, आरोग्य केंद्रे, दुकानदार, शाळा, महाविद्यालये आणि अगदी शेतकरीही याचा पुरेपूर लाभ घेऊ शकतील. कोरोनाच्या काळात इंटरनेटचं महत्त्व समजलं आहे. ते पाहता, 5G आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे जीवन अधिक चांगलं आणि सोपं करण्याकडे कल असेल. 5G मुळे चालकाशिवाय कार चालवणं शक्य होणार आहे. याशिवाय तुम्ही काही सेकंदात मोबाईलवर व्हिडीओ, सिनेमा डाऊनलोड करू शकता. स्मार्ट सीटी आणि डिजिटल पेमेंटसाठी याचा मोठा फायदा होईल. मोठ्या फाईल्स, फोटो काही सेकंदात पाठवणं सहज शक्य होईल.
गेमिंग क्षेत्रात ही मोठी क्रांती असल्याचं मानलं जात आहे. रीयल टाइम गेम खेळण्यासाठी याचा उपयोग होईल. शाळा-महाविद्यालयामध्ये याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण एक वर्षांचा कालावधी लागू शकतो असं सांगितलं जात आहे. सध्या फक्त १३ शहरांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे.