दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कारच्या बोनेटवर उभं राहून करणार भाषण?
मुंबई, 22 सप्टेंबर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद हा सध्या मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यापाठोपाठ शिंदे गटही कोर्टात गेला आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. याप्रकरणाची सुनावणी आता उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी आधीच बीकेसीमधलं मैदान मिळालं आहे. या मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठीही ठाकरे गटाने परवानगी मागितली होती. दोन्ही मैदानांवरून कोंडी झाल्यामुळे आता उद्धव ठाकरे दसरा मेळावा कुठे घेणार, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, त्यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्वीट केलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण करत आहेत. आतुरता दसरा मेळाव्याची, पुनरावृत्ती होणार, असं कॅप्शन किशोरी पेडणेकर यांनी या फोटोला दिलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्या या ट्वीटमुळे उद्धव ठाकरे दसरा मेळावा गाडीच्या बोनेटवर घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवसेना ठाकरे गटाची याचिका कोर्टाची दिशाभूल करणारी आहे. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावाच सदा सरवणकर यांनी त्यांच्या याचिकेत केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होईल, असा विश्वास काल झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात व्यक्त केला.