वर्धा, 21 जुलै : यंदाच्या वर्षी सुरुवातीला पावसाच्या दडीमुळे तर नंतर सततच्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका (crop damage) बसला आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. यामुळे तूर, कपाशी, सोयाबीन पिकांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेत जमीन पाण्याखाली जाऊन जिल्ह्यातील 30.54 टक्के पिकांचे (Crops rotted due to rain) पूर्णत: नुकसान झाले. या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे (farmer) कंबरडेच मोडले आहे. जिल्ह्यात तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे उत्पन्न शेतकरी घेतात. आतापर्यंत जिल्ह्यात 97.62 टक्के म्हणजेच 4 लाख 2 हजार 119 हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे. पण जुलै महिन्यात 19 रोजीपर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 22 हजार 826.7 हेक्टरवरील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात पाऊस लांबल्याने तब्बल चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तर आता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणी करावी लागणार आहे. हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त यावेळी प्रचंड पाऊस झाला आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी आहे. शेतीत जायला रस्ता देखील राहिला नाही. पिक पाण्याखाली गेली असून सडण्याच्या मार्गावर आहेत. उसनवारी, कर्जबाजारी होऊन पेरणी केली आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे उभे पिक पाण्यात गेले. यात आमचे मोठे नुकसान झाले असून शासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी बोधड येथील शेतकरी गणेश गावडे यांनी केली आहे. प्रमुख पिकांची स्थिती कापूस- यंदाच्या वर्षी जिल्ह्यात 2 लाख 14 हजार 891.49 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. सध्या कपाशी पीक वाढीच्या अवस्थेत असले तरी सततच्या पावसामुळे या पिकाची वाढच मंदावली आहे. इतकेच नव्हे तर सततच्या पावसामुळे या पिकावर बुरशीजन्य रोगांची शक्यता वर्तविली जात आहे. हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची ‘ही’ तरुणी करणार सादरीकरण, VIDEO तूर- जिल्ह्यातील 59 हजार 343 हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड झाली असून सततच्या पावसामुळे या पिकाची वाढच सध्या मंदावली आहे. त्यामुळे तूर उत्पादकांच्या अडचणीत चांगली भर पडली आहे. या पिकाला विविध आजार जडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोयाबीन- दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाची यंदा 1 लाख 26 हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असले तरी अतिवृष्टीमुळे पिकाची वाढच मंदावल्याचे वास्तव आहे. आणखी काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव या पिकावर होण्याची दाट शक्यता आहे. अवघ्या 19 दिवसांत तब्बल 717.8 मिमी पाऊस जून महिन्यात पावसाने दडी मारल्याचे वास्तव असले तरी जुलै महिन्यात पावसाने अतिरेक केला आहे. 1 ते 19 जुलै या काळात वर्धा जिल्ह्यात तब्बल 717.8 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. नुकसानीची प्राथमिक स्थिती
तालुका | 1 ते 15 जुलै | 17 ते 19 जुलै |
---|---|---|
वर्धा | 3481 हेक्टर | 15200 हेक्टर |
सेलू | 720 हेक्टर | 7700 हेक्टर |
देवळी | 26000 हेक्टर | 32400 हेक्टर |
आर्वी | 4560 हेक्टर | 3977 हेक्टर |
आष्टी | 449.6 हेक्टर | 324 हेक्टर |
कारंजा | 00 हेक्टर | 84 हेक्टर |
समुद्रपूर | 4200 हेक्टर | 8140 हेक्टर |
हिंगणघाट | 3591 हेक्टर | 12000 हेक्टर |
एकूण हेक्टर झालेली पेरणी 4,02,119 एकूण हेक्टर झालेलं पिकांचे नुकसान 1,22,826