मुंबई, 14 ऑगस्ट : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज पहाटे मुबंई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जातेय. मराठा समाजासाठी आक्रमकपणे भूमिका मांडणारा नेता हरपला, मराठ्यांचा आवाज हरपला, अशा भावना सर्वसामान्य नागरीक आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. विनायक मेटेंच्या निधनानंतर त्यांचा प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसंग्राम पक्षाला मंत्रिमंडळात स्थान द्यावं, अशी मागणी केली आहे. त्यांनी काल याबाबतची मागणी केल्यानंतर आज पहाटे त्यांचं अपघाती निधन झालं आहे. विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या शेवटच्या प्रतिक्रियेत शिवसंग्रामला मंत्रिपद देण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसंग्रामला 2014 ते 2019 काळात मंत्रिपद मिळालं नाही. भाजपने शिवसंग्राम सोडून सर्व मित्रपक्षांना मंत्रिपदाची संधी दिली. यावेळी तरी ती संधी आम्हाला द्यावी, अशी मागणी मेटेंनी केली होती. पण त्यांच्या शिवसंग्रामला मंत्रिपद मिळवून देण्याचं स्वप्न अखेर अधुरच राहीलं. कारण मेटेंनी त्याबाबतची मागणी केल्यानंतर आज दुर्देवाने त्यांचं अपघाती निधन झालं. विनायक मेटे नेमकं काय म्हणाले होते? “मित्रपक्षांना संपवणं हे भाजपचं धोरण आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्याबद्दल मी एवढंच म्हणेल, मी देशातील परिस्थितीत बद्दल बोलणार नाही. पण शिवसंग्राम 2014 पासून भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून काम करत आहे. त्यावेळी आम्ही भाजपसोबत गेलो तेव्हा शिवसेवा, शिवसंग्राम, आरपीआय, रासप, शेतकरी संघटना अशा सगळ्या सहा पक्षांची मिळून महायुती झाली होती. या महायुतीचं 2014 साली जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा त्या सरकारमध्ये शिवसंग्राम वगळता सर्व मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देवून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा सन्मान केला होता. त्यावेळेस शिवसंग्रामवर शंभर टक्के अन्याय झाला होता. पण त्यावेळेस त्यांना काही अडचणी आल्या होत्या”, असं विनायक मेटे म्हणाले होते. ( गुणरत्न सदावर्तेंनी काढला पळ; मेटेंच्या अंतिम दर्शनासाठी आल्याने मराठा कार्यकर्ते आक्रमक ) “आता परत एकदा शिंदे-फडणवीस यांचं सरकार आलेलं आहे. या सरकारमध्ये सुद्धा जे मित्रपक्ष आहेत त्यांना जो शब्द दिला आहे तो शब्द भाजप पाळेल याबद्दल मला अजिबात शंका वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते दिलेला शब्द पाळतात. हा आमचा अनुभव आहे. मित्रपक्ष होते त्यांनाही तो अनुभव आला आहे. उलट सगळ्या मित्रपक्षांपेक्षा आमच्या शिवसंग्रामला संधी मिळाली नाही. पण बाकी सगळ्या मित्रपक्षांना संधी मिळाली. शिवसंग्रामला यावेळी संधी मिळेल”, अशी आशा मेटेंनी व्यक्त केली होती.