मुंबई, 9 नोव्हेंबर : शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी जामीन मिळाला आहे. पीएमएलए कोर्टाने जामीन दिल्यानंतर आता संजय राऊत यांचा जेलबाहेर यायचा मार्ग मोकळा झाला आहे. मागचे 100 दिवस संजय राऊत हे जेलमध्ये होते. पीएमएलए कोर्टाने दिलेल्या जामिनाविरोधात ईडीने हायकोर्टातही धाव घेतली, पण हायकोर्टाने पीएमएलए कोर्टाचा निर्णय योग्य ठरवला. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्य आनंदाचं वातावरण आहे. आर्थर रोड जेल आणि शिवसेना भवनबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे, तसंच संजय राऊत यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचं समजताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण राऊत कोठडीत असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचं थेट बोलणं होऊ शकलं नाही. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. ‘संजय राऊतांची अटक बेकायदेशीर’, कोर्टाने ईडीला फटकारलं संजय सावंत या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या फोनवर उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटणार आहे, असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिला. संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरेंचा निरोप मिळाल्यानंतर धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली. आर्थर रोड जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत हे सगळ्यात पहिले सिद्धीविनायक मंदिरात जाणार आहेत. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर ते शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत, यानंतर ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी जातील.