ठाणे, 28 ऑगस्ट : मागच्या काही दिवसांपासून ठाण्यात गुन्हेगारीच्या प्रमामात वाढ होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात 16 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. (Thane Gangrape Case) आयपीसी कलम ३७६(डी) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नारपोली पोलिस ठाण्याकडे तपास वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने ठाणे जिल्हा हादरला आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. एनआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
पुणे हादरले पुण्यातही बलात्कार
धावत्या रेल्वेत मावस बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका नराधमाला सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी हा निकाल दिला. आठ वर्षांपूर्वी हरिद्वार ते पुणे धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये हा गुन्हा करणाऱ्या नराधम भावाला शिक्षा झाल्याने पीडितेला न्याय मिळाला आहे.
हे ही वाचा : नाशकात दारू पिऊन बसमध्ये बसली महिला; तर्राट होऊन धिंगाणा, पोलिसांनाही आवरेना, शेवटी..
आरोपी ‘मर्चंट नेव्ही’ मधील अभियंता असून, त्याला बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले. याबाबत पीडितेने भोसरी ‘एमआयडी’ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार 14 जुलै 2015 रोजी संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात पीडितेच्या मावशीच्या घरी घडला.
घटनेच्या दिवशी पीडित मुलगी, तिची मावशी आणि आरोपी मावस भाऊ रेल्वेने पुण्यात येत होते. भोपाळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वी पीडित मुलगी रेल्वेतील स्वच्छतागृहात गेली. तिथून बाहेर येत असताना आरोपीने तिला पुन्हा स्वच्छतागृहात ढकलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडितेने पुण्यात आल्यावर घडलेला प्रकार तिच्या मावशीला आणि मैत्रिणीला सांगितला. दुसऱ्या दिवशी पीडितेच्या मैत्रिणी तिच्या मावशीच्या घरी आल्या. त्यावेळी पीडिता त्यांना रेल्वेत घडलेली घटना सांगत असताना मावस भाऊ तिथे आला.
हे ही वाचा : Sonali Phogat: सोनाली प्रकरणात पाचव्या आरोपीची मोठी कबुली; ड्रग्स चेनचा भांडाफोड
त्याने पीडितेला जमिनीवर ढकलून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मावशीने आणि पीडितेच्या मैत्रिणीने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना मारहाण केली आणि घरातून पोबारा केला. या प्रकरणात आरोपीवर भोसरी एमआयडीसी आणि भोपाळ रेल्वे पोलिस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, धमकावणे यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील आणि सहायक पोलिस फौजदार नारायण पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.