मुंबई, 25 ऑक्टोबर : शिवसेनेची भाजपसोबत 2019 साली युतीची चर्चा फिस्कटल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पावित्रा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. या सगळ्या सत्ता नाट्यात शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री झाला. दरम्यान सत्ता स्थापनेनंतर कोरोनामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेत्यांकडून करण्यात आला. यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे नेते ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
आजारपणातून बरे होत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून सरकारला मदतीची अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांनंतर घराबाहेर पडल्याचा आरोप करत नरेश म्हस्के म्हणाले की, आजारपण नाही, शिंदे साहेबांना डॉक्टरच म्हटले पाहिजेत..त्यांच्या धाकाने का होईना, उद्धव साहेब बांद्रयाच्या, मुंबईच्या बाहेर पडले. शिंदे साहेबांच्या सुसाट कामाची मात्रा लागू पडली म्हणायची… बाकी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रालाच आजारी करून ठेवलं होतं स्वतःसोबत अशा खरमरीत शब्दात टीका केली आहे. म्हस्के यांनी मनिषा कायंदे याच्या ट्वीटला हे उत्तर दिले आहे.
हे ही वाचा : मनसेसोबत महायुतीच्या चर्चेला लागणार ब्रेक? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठ विधान
औरंगाबाद दौऱ्यावर असताना काय म्हणाले उद्धव ठाकरे
‘मला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं हरकत नाही. माझ्याशी आणि शिवसेनेची गद्दारी केली पण निदान बळीराजाची गद्दारी करू नका, शेतकऱ्यांसोबत गद्दारी करणारे सरकार आहे. शेतकरी संकटामध्ये सापडला आहे. तो तुम्हाला दिसत नाही. तुम्ही फक्त घर घर फिरत आहात, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या;, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत पोहोचले. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
हे ही वाचा : दिवाळीच्या मुहूर्तावर दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत फडणवीसांनीच फोडला बॉम्ब
मला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं हरकत नाही. माझ्याशी आणि शिवसेनेची गद्दारी केली पण निदान बळीराजाची गद्दारी करू नका, शेतकऱ्यांसोबत गद्दारी करणारे सरकार आहे. शेतकरी संकटामध्ये सापडला आहे. तो तुम्हाला दिसत नाही. तुम्ही फक्त घर घर फिरत आहात, शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.