JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'राज्यपालांनी माती खाल्ली, महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, नाहीतर..'; ठाकरे गटाची जहरी टीका

'राज्यपालांनी माती खाल्ली, महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, नाहीतर..'; ठाकरे गटाची जहरी टीका

‘पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल!’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 21 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत’, असं राज्यपालांनी म्हटलं होतं. यावरुन विरोधी पक्षांनी भाजप आणि राज्यपालांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आता सामानाच्या अग्रलेखातूनही राज्यपालांवर सडकून टीका करण्यात आली आहे. काय आहे सामनाच्या अग्रलेखात - शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल! सासरे-जावयाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; ‘या’मुळे पोलिसांनीच नाकारली हर्षवर्धन जाधव अन् दानवेंची भेट वीर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून ‘माफीवीर’ असा उल्लेख झाला. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत श्री. गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘‘शिवसेना आता काय करणार?’’ असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण ‘‘शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा मुक्काम वाढला, आणखी 2 दिवस महाराष्ट्रात, कारण… महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला आहे. राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला. आश्चर्य असे की, वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? ‘‘शिवरायांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठवली’’ या विधानाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार महाराष्ट्राच्या माथी मारले. त्यांनी राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले. त्यांच्याकडून शिवरायांच्या गौरवाची अपेक्षा काय करणार! शिवाजी महाराजांविषयी चुकीची विधाने करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. ‘‘समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला विचारतोय कोण?’’ असे एक विधान अलीकडे करून याच राज्यपाल महोदयांनी शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही महाराष्ट्रात संतापाचा स्फोट झाला. ‘‘मुंबईतून गुजराती-राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’’ असे आणखी एक विधान करून मुंबईतील कष्टकरी, स्वाभिमानी मराठी माणसांचा अपमान त्यांनी केला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही राज्यपालांनी असेच घाणेरडे विधान करून गोंधळ घातला तेव्हा त्यांना माफी मागावी लागली. आता तर त्यांनी थेट शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचे धारिष्ट्य दाखवले. हे बळ त्यांच्यात आले ते महाराष्ट्रात एक मिंधे आणि बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ‘ब्र’ काढायला तयार नाहीत, असं म्हणत अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गटावरही सडकून टीका केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या