मराठी माणसाने पैसा कमवायचे म्हटले की, तो अपराध ठरतो. मराठी माणसांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’ने टाळे लावले
मुंबई, 7 ऑगस्ट : ‘राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. पण प्रश्न कायम आहे! मुंबई व गुजराती बांधवांचे नाते काय? गुजराती मुंबईत कधी आले? मराठी माणसांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’ने टाळे लावले व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला. राज्यपाल महोदय, कधीतरी यावरही बोला, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे ८ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. पण कोठडीत असूनही संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोक सदरातून राज्यपालांवर टीकास्त्र सोडले आहे. कोश्यारी यांनी त्यांच्या एका भाषणात काय सांगितले? ‘‘गुजराती व मारवाडी लोक मुंबईत आहेत म्हणून मुंबईस आर्थिक राजधानीचा दर्जा आहे. गुजराती-मारवाडी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसाच शिल्लक राहणार नाही.’’ राज्यपालांचे हे विधान निर्हेतुक कसे असेल? मुंबईतील गुजराती-मारवाडी समाजाच्या लोकांनाही कोश्यारी यांचे विधान आवडले नाही व त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा करताच ज्यांचे पित्त खवळले, त्यांनी महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या अपमानाबद्दल साधा निषेध केला नाही. हासुद्धा महाराष्ट्राचा अपमानच आहे. मुंबईवर इतिहासकाळात राज्य करणारे गुजराती म्हणजे मुसलमान सुलतान होते, पण त्यांचेही कर्तृत्व असे की, फिरंग्यांच्या सततच्या हल्ल्यांना कंटाळून त्यांनी मुंबई फिरंग्यांना देऊन टाकली! सन 1534 सालात बहादूरशहा बेगदाने हा करार केला. दुसऱ्याचा माल तिसऱ्याला देऊन स्वतःचा जीव वाचविण्याची दलाली या बेगदाने घेतली. मराठी राज्यकर्त्यांनी फिरंग्यांबरोबरच्या लढाईत प्राण दिले. तेव्हाच मुंबई शत्रूंना घेता आली. मुंबईसाठी मराठी व मराठे आपले रक्त सांडतात हा इतिहास आहे व कोश्यारी यांच्यासारख्या महनीय व्यक्तींनी तो समजून घेतला पाहिजे. मुंबईत मराठी माणूस सतत श्रम करीत राहिला व संकटांशी लढत राहिला. बाकी सगळे आले ते फक्त लक्ष्मीदर्शनासाठी, असा टोला राऊतांनी राज्यपालांना लगावला. इंग्रजांनी पाया घातला मुंबईच्या विकासाचा पाया कोणी घातला व आज जे मुंबईचे ‘आर्थिक महत्त्व’ आहे ते कोणामुळे निर्माण झाले? गुजराती समाजाचे त्यात किती योगदान आहे? हे नव्या पिढीने समजून घेतले पाहिजे. 1668 साली मुंबई ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आली. सुरतेच्या महाजन म्हणजे बनिया लोकांनी मुंबईला येण्यापूर्वी अँजिअरकडे काही आश्वासने आणि हक्क मागितले. अँजिअरने कंपनीतर्फे त्यांचे म्हणणे मान्य होईल असे आश्वासन या महाजनांना दिले. या लोकांना अँजिअरने व्यापाराच्या आणि इतर मिळून दहा सवलती दिल्या आणि या सवलती मिळाल्यावरच ते मुंबईत आले. आधी जीव वाचविण्यासाठी व नंतर व्यापारात नशीब काढण्यासाठी गुजराती समाजाने मुंबईचा आश्रय घेतला व ते टिकून राहिले. महाराष्ट्राचेच ते घटक बनले, असंही राऊत म्हणाले. ( महादेवाच्या अश्रूंपासून झाली रुद्राक्षाची उत्पत्ती;धारण करण्याचे नियम समजून घ्या ) अनेक पारशी व मराठी लोकांनी मुंबईचे वैभव वाढविले. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट या पुरुषाचे मुंबईच्या वैभवात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते स्वतः मोठे धनाढय़ होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपत्ती मिळवली व मुंबईचे वैभव वाढविण्यासाठी खर्च केली. मुंबईचा विकास व असंख्य लोकोपयोगी कामे करण्यासाठी नाना शंकरशेट यांनी आपल्या संपत्तीचा प्रवाह वाहता ठेवला. भाऊ दाजी लाड हे मुंबईच्या वैभवात भर टाकणारे आणखी एक नाव. मराठी धनिक लोक हे कधीच व्यापारी वृत्तीने वागले नाहीत. आपल्या मुंबईसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले.गुजराती, पारशी, मराठी असा हा त्रिवेणी संगम मुंबईत महत्त्वाचा ठरतो. मुंबईत आलेला गुजराती समाज पुढे येथे दुधात साखर विरघळावी तसा विरघळून गेला. मुंबईचे अर्थकारण तो चालवतो हे खरे. म्हणून येथील श्रमिकांचे महत्त्व कमी होत नाही. गुजरात व महाराष्ट्र पूर्वी एकच राज्य होते. आज ती जुळी भावंडे बनली आहेत. मग उगाच दुधात मिठाचा खडा का टाकायचा? असा सवाल राऊतांनी केला. ( ‘फ्रेंडशिप डे’ला तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश ) गुजराती व मारवाडी लोकांनी मुंबईत येऊन व्यापार केला व पैसा कमावला. महाराष्ट्राच्या भूगोलावर मुंबई आहे व मुंबईवर मराठी माणसांचा पहिला हक्क आहे. पैशात तो कमी असेल आणि आता तर मराठी माणसाने पैसा कमवायचे म्हटले की, तो अपराध ठरतो. मराठी माणसांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’ने टाळे लावले व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला. राज्यपाल महोदय, कधीतरी यावरही बोला. राज्यपाल कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राची माफी मागितली आहे. त्यामुळे विषयावर पडदा पडला असला तरी मुंबईच्या विरोधातील कारस्थाने सुरूच राहतील. ती कायमचीच थांबवायला हवीत, असंही राऊत म्हणाले.