मुंबई, 06 जानेवारी : उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. आयोगाकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. यानंतर आता राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, तेजस्वीनी पंडितला पत्र पाठवल्याचा आरोप चुकीचा, राज्य महिला आयोगाने पत्र पाठवलं ते संजय जाधव यांना पाठवलं. जे अनुराधा या वेब मालिकेचे दिग्दर्शक आहेत. अनुराधा या वेबसिरीजच्या प्रचारासाठी तेजस्विनीचे जे पोस्टर लावले आहेत त्यातून धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शनाचा संदेश समाजात जात असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या वेबसिरिजचे दिग्दर्शक म्हणून तुमचा उद्देश आणि भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असून त्याबाबत तुमचे म्हणणे सादर करा अशी नोटीस पाठवली होती असंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा : आमदार बच्चू कडूंची वेगळी चूल? प्रहार व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार; शिंदे-फडणवीसांवर आरोप राज्य महिला आयोगाच्या नोटीसीनंतर संजय जाधव यांनी त्यांची भूमिका मांडली. दरम्यान, आम्ही तेजस्विनी पंडितचा संबंधित पत्रात कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. उर्फी जावेदला पत्र देत नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आयोग करत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. पण स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आणि आकसापोटी आय़ोगावर जी भूमिका घेतलीय या प्रकरणी आम्ही चित्रा वाघ यांना नोटीस पाठवतोय. मेलद्वारे ही नोटीसही पाठवली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. चित्रा वाघ यांच्यावर तीन आरोप महिलेच्या पेहरावाबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत अप्रतिष्ठा होईल असं वक्तव्य केलं. तसंच राज्य महिला आय़ोगाच्या नोटीसीचा चुकीचा अर्थ काढून आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल असं वर्तन केलं आहे. दोन महिलांच्या विभिन्न प्रकरणांची हेतुपुस्पर तुलना करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगाने या प्रकऱणी खुलासा दोन दिवसात सादर करावा. अन्यथा तुमचे काही म्हणणे नाही असे समजून आयोगाकडून कारवाई केली जाईल असा इशारा राज्य महिला आयोगाकडून अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला.