बीड, 26 मे: राज्यात आणि संपूर्ण देशात कोरोना (Corona in India) काळात स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र बीडजवळील परळी याठिकाणी घडलेल्या एका घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. परळी शहरात संध्याकाळी आणि एकदा सकाळच्या सुमारास एका मनोरुग्ण व्यक्ती चक्क वापरून फेकलेले पीपीई किट घालून फिरताना आढळून आली. परळीच्या रस्त्यावर अशाप्रकारे गाणं म्हणत फिरत असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. दरम्यान या घटनेनंतर पीपीई किट, मास्क वापरून झाल्यावर त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे हे समोर आले आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून यापासून बचाव करण्यासाठी मास्क, पीपीई किट, हात मोजे वापरणे गजेचे आहे आणि याचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र हा असा प्रकार घडल्यानंतर हे समोर येतं आहे की, परळी शहरात वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पीपीई किट उघड्यावर फेकणे धोकादायक ठरू शकते. कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. हे वाचा- Covid Vaccine पुरवठ्यासाठी BMCच्या ग्लोबल टेंडरला 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण… परळीच्या कचरा संकलनात रस्त्यावर रस्त्याच्या कडेला रूग्णालयांत वापरण्यात येणारे सुरक्षा उपकरणे फेकले जात आहेत. वापरलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पीपीई किटच्या कचऱ्याचा निचरा जिथल्या तिथे झाला पाहिजे. परंतु हा कचरा रस्त्यावर येत असल्याने कोरोना काळात ही धोकादायक बाब आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे . याकडे संबंधित यंत्रणेने तात्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
वापरलेले पीपीई कीट एका मनोरुग्ण व्यक्तीच्या हाती लागणे हा अतिशय चिंताजनक प्रकार समोर आला आहे. हा इसम हे पीपीई कीट घालून गाणे म्हणत परळीच्या रस्त्यावर फिरत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरातून होणारे प्रयत्न लक्षात घेता हा प्रकार धक्कादायक आहे.दुर्देवाने असाच एखादा व्यक्ती ‘सुपरस्प्रेडर’ बनुन धोकादायक ठरू शकतो याकडे प्रशासनाने गांभीर्यानं लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.