मुंबई, 11 ऑक्टोबर : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कुणाची? यावरून वाद सुरू आहेत. या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. तसंच दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून वेगवेगळी नावं आणि चिन्ह देण्यात आली आहेत. शिवसेना कुणाची हा निर्णय लागेपर्यंत दोन्ही गटांना आगामी निवडणुकांमध्ये याच चिन्हं आणि नावासह रिंगणात उतरावं लागणार आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवेसना आणि ढाल-तलवार चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींचे आभार मानले, तसंच महाविकासआघाडी भक्कम करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं नाना पटोले म्हणाले. अंधेरीमध्ये पहिली लढाई अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे नवीन चिन्ह आणि पक्षाच्या नावासह रिंगणात उतरत आहेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तर भाजप आणि शिंदे यांनी अजून उमेदवाराची घोषणा केलेली नाही, पण भाजपच्या मुरजी पटेल यांना या मतदारसंघातून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.