त्रिशुल जेव्हा धार्मिक निशाणी असल्याचे सांगून निवडणूक आयोगाने ते नाकारलं. जर त्रिशुल धार्मिक निशाणी असेल तर ढाल तलवार सुद्धा
मुंबई, 11 ऑक्टोबर : निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. आता परफेक्ट काम झालं आहे. मराठमोळी निशाणी आहे, छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांची निशाणी आहे. हजारो लोक आमच्यासोबत येत आहेत, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ठाकरे आणि शिंदे यांच्यातल्या वादानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली आहेत. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना ही नावं देण्यात आली. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला धगधगती मशाल आणि शिंदेंना ढाल-तलवार हे चिन्ह दिलं गेलं. एकनाथ शिंदे यांनी याआधी निवडणूक आयोगाला दिलेली चिन्हं नाकारण्यात आली, त्यानंतर त्यांना नवीन चिन्हांचा प्रस्ताव द्यायच्या सूचना आयोगाने केल्या होत्या.
धनुष्यबाण गेल्याची खंत दरम्यान धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं नसल्याची खंत काल एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली होती. चिन्हावरचा दावा आमचा ॲान मेरीट पेंडीग आहे. आमचा धनुष्य बाणावरील दावा आहे. ते आम्हाला मिळाले नाही हा आमच्या वरचा अन्याय आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला होता.
अंधेरीमध्ये पहिली लढाई शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांना नवीन निशाणी मिळाल्यानंतर पहिली लढत अंधेरी पूर्वमध्ये होणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. अंधेरी पूर्वच्या या जागेवर उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नींना उमेदवारी दिली आहे, तर शिंदे आणि भाजपचा उमेदवार ठरलेला नाही, पण ही जागा भाजप लढवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजप या जागेवरून मुरजी पटेल यांना उमेदवारी द्यायची शक्यता आहे.