Mumbai: Shiv Sena leader Aditya Thackeray during a press conference at Sena Bhavan in Mumbai, Thursday, Oct. 24, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI10_24_2019_000234B)
हैदर शेख,प्रतिनिधी चंद्रपूर, 11 एप्रिल : देशात कोरोना संकटामुळे लॉक डाउन जाहीर झाले आहे. देशातील व्यावसायिक व उद्योग प्रतिष्ठाने बंद आहेत. चंद्रपुरात बाळंत झालेल्या एका महिलेला या बंदमुळे अडचणीचा सामना करावा लागला होता. परंतु, या महिलेनं ट्वीट करून मदतीची याचना केली . त्यानंतर खुद्द कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे या महिलेच्या मदतीला धावून आले आणि वेळीच मदतही पुरवली. चंद्रपूर शहरात राहणाऱ्या पूनम देशंपाडे यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. परंतु, बाळाचा झाल्यावर या बाळासाठी नवे कपडे घेण्याचा प्रश्न समोर उभा राहिला. काही दिवसांचे हे बाळ कोरोना आजारासाठी अधिक संवेदनशील असते. मात्र, कपड्याची दुकाने बंद असल्यामुळे बाळाचे कपडे आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला.
मार्ग सुचत नसल्याने पूनम देशपांडे यांनी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांचे कार्यालय तसंच पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या कार्यालयाला ट्वीट करून मदत मागितली. काही तासांतच राज्याचे कॅबिनेट मंत्री युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयातून पूनम देशपांडे यांना प्रतिसाद देण्यात आला. त्यांची अडचण समजून घेण्यात आली आणि त्यानंतर काही तासात चंद्रपूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते या कुटुंबाला नवजात बाळासाठीची किट आणि कपडे उपलब्ध करून देण्यात आले. हेही वाचा - मुंबईतून ‘कोरोना’ला पळवण्यासाठी आला ‘रोबोट’, अशी करणार धुलाई! अत्यंत तातडीने संवेदनशील विषयात आदित्य ठाकरे यांनी मदत केल्याबद्दल देशपांडे आणि अंबरकर परिवाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांचे आभार मानले आहेत. अशाच प्रकारे अडचणीत आलेल्या मातांना यापुढच्या काळातही मदत लाभो, अशी अपेक्षाही पुनम देशपांडे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे. देश लॉकडाउन असताना आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयाने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांना सुखावून गेली आहे.