मुंबई, 19 फेब्रुवारी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर (Shiv Sena) प्रचंड गंभीर आरोप केले. त्यांच्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडून (Shiv Sena) उत्तर देण्यात आलं. शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या नेतृत्वात परिषद घेण्यात आली. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या देखील उपस्थित होत्या. या पत्रकार परिषदेत भाष्य करत असताना विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सिंधुदुर्गातील 7 जणांच्या खूनमागे नारायण राणे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. विनायक राऊत नेमकं काय म्हणाले? “दुसऱ्यांवर खुनाचे आरोप करताना, नारायण राणे यांना त्यांच्या वाढत्या वयामुळे आठवत नसेल. इतरांवर आरोप करताना सिंधुदुर्गात खून, दरोडे, खंडनी असे 9 वर्षे प्रकार घडत होते. मंचेकर, श्रीधर नाईक, गोवेकर यांच्या खुनात कुणाचा सहभाग होता? श्रीधर नाईक खुनात तर राणेंचा थेट सहभाग होता”, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेने एक व्हिडीओ दाखवला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नारायण राणे यांची कुंडली वाचून दाखवली होती असं म्हणत त्याबाबतचा व्हिडीयो दाखवण्यात आला. “राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सिंधुदुर्गात झालेल्या खूनासंदर्भात पुन्हा तपास करुन त्यामागे कोण होते, याचा तपास करण्यासाठी भेटणार आहोत”, असं विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं. “राणे कुटुंबाने मुंबईत अविघ्न सोसायटीमध्ये 300 कोटींचा घोटाळा केला”, असा खळबळजनक दावा केला. ‘राणेंची पत्रकार परिषद म्हणजेव खोदा पहाड आणि निकला कचरा’ “केंद्रीय सुक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करुन विनायक राऊत आणि ‘मातोश्री’ संदर्भात ट्विट केलं आणि आज त्यांची पत्रकार परीषद झाली. त्यांनी जी बडेजावपणाने घोषणा केली होती त्यातून फक्त खोदा पहाड आणि निकला कचरा, अशी अवस्था होती. स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी कशी मिळवायची त्याचं हे उदाहरण होतं”, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला. ( “सुशांतसिंहच्या घरी काहीजण गेले, मंत्र्याची गाडी होती, बाचाबाची झाली आणि….” नारायण राणेंचा खळबळजनक दावा ) “केंद्रीय मंत्री ईडीचा दुरुपयोग करुन धमकी देनं हा केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर आहे. ईडीच्या कार्यालयातून त्यांनी कागदपत्र चोरली असतील. कोणा-कोणाच्या सुपाऱ्या यांनी वाजवल्या? ईडीच्या टोळक्याचे सुरु असलेले उपद्व्याप आणि केंद्रीय मंत्र्याचा दुरुपयोग आम्ही पंतप्रधानांना येत्या अधिवेशनात सांगणार आहोत”, असं विनायक राऊत म्हणाले. “ईडीच्या कार्यालयातून त्यांनी कागदपत्र चोरली आहेत”, अशी टीका राऊतांनी यावेळी केली. “आम्ही कोणाच्या नथीतून बाण मारणार नाही. नारायण राणेंच्या चिवला बीच वरचा बंगला काय करणार? सिंधुदुर्गात 7 जणांचा खून करण्यात आलाय. त्यामागे कोण आहेत?”, असे सवाल विनायक राऊत यांनी यावेळी केला. यावेळी शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे केलेल्या आरोपांचा व्हिडीयो दाखवण्यात आला. या पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेनेचे संजय राऊत अचानक आले.