'अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी मला खात्री आहे'
मुंबई, 10 डिसेंबर : ‘महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही’, असं म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला उघडपणे इशारा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राच्या सीमाभागाबद्दल वारंवार विधान करत आहे. त्यांच्या या विधानावर पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही फरक पडणार नाही, अशी भाषा म्हणजे उन्मादाची बाब आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. सर्वात मोठ्या पक्षाचे ते दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तडजोडीची भूमिका घेतल्यावरही आम्ही काहीच करू देणार नाही याचा अर्थ याला रगड म्हटल जातं, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर निशाणा साधला. ( ‘तुम्ही कोणालाही भेटा…,’ कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा शिंदे सरकारला पुन्हा थेट इशारा) ‘अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. आम्ही राज्यात एकत्र आहोत, भाजपचा अर्धा महाराष्ट्राने शिवसेनेचा अर्धा महाराष्ट्राचा होऊ शकत नाही आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमची अस्मिता एकच आहे, असंही पाटील म्हणाले. तर, कर्नाटकचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची भेट सुद्धा घेणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत कोर्टामध्ये ही भूमिका पुढे येत नाही तोपर्यंत कोणी टीका टिप्पणी करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. (मुख्यमंत्र्यांचं तोंड बंद का? शिंदे गटांचं चिन्ह कुलूप पाहिजे, संजय राऊत कडाडले) तसंच, विरोधी पक्षांना काय करायची टीका त्यांनी करू द्या. अजित पवार काय बोलले ते आम्ही पाहत नाही. विरोधी पक्षाचे कामच आहे टीका करणे पण आम्ही जे काम करतोय त्यात समृद्धी हायवे असेल किंवा शेतकऱ्यांना मदत असेल ती या सरकारमार्फतच होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची टिकायला आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही, असंही सामंत म्हणाले.