सातारा, 29 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबाबत ओळखले जातात. अजितदादांच्या या स्वभावामुळे कार्यकर्तेही त्यांना चांगलेच घाबरून राहतात, याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे. साताऱ्यातील धामणेर गावातील एका कार्यक्रमाला अजित पवार आले होते, त्यावेळी अजित पवारांसाठी व्यासपीठावर वेगळा सोफा ठेवण्यात आला होता, हे पाहून अजित पवार चांगलेच नाराज झाले, आणि त्यांनी कार्यकर्त्यांना सोफा हटवण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायत विकास तसंच विकास सेवा सोसायटीच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनासाठी अजित पवार धामणेर गावात आले होते. स्टेजवर ठेवलेला सोफा पाहून अजित पवार भडकल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. अजित पवारांनी आवाज वाढवून ठेवलेला हा सोफा काढायला लागवाल आणि सर्वांसाठी ठेवलेल्या सोफ्यापैकी एक लावण्यास सांगितलं, यावेळी कार्यकर्त्यांची मात्र मोठी धांदल उडाली. यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटीलही उपस्थित होते.
दरम्यान अजित पवार यांनी पहाटेच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीबाबत पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या चर्चा महागाई, बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी केल्या जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची राज्यातली राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी असू शकते, अशी शंका व्यक्त केली होती, त्यानंतर या चर्चांना सुरूवात झाली होती.