संजय राऊत, अमित शाह
मुंबई, 14 डिसेंबर : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावरून भाजपवर आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सीमा वादाचा लढा हा जरी न्यायालयात सुरू असला तरी देखील या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी सीमा प्रश्नावरून अमित शाह यांना टोला लगावला आहे. अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांची सासरवाडी असलेल्या कोल्हापूरला सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत आहेत, त्यामुळे अमित शाह यांनी या प्रकरणात भूमिका घ्यावी असं राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं संजय राऊत हे सीमावादावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणात केंद्राने लक्ष घालावं अशी मागणी केली आहे. बेळगाव आणि सीमावर्ती भागातील लोकांवर अत्याचार सुरू आहेत. सीमावर्ती भागात कन्नड पोलीस धूडगूस घालत आहेत. त्यामुळे तिकडे केंद्रीय यंत्रणा पाठवण्याची गरज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सध्या हा वाद जरी कोर्टात सुरू असला तरी अमित शाह हे या प्रकरणात भूमिका घेऊ शकतात असं राऊत यांनी म्हटलं आहे. अमित शाहांना टोला दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी अमित शाह यांना सीमावादावरून टोला लगावला आहे. अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत. सीमावादाचे सर्वाधिक चटके हे कोल्हापूरला बसत आहेत. कोल्हापूर अमित शाह यांची सासरवाडी असल्याचं म्हणत राऊत यांनी शाह यांना टोला लगावला आहे. केंद्र सरकारवर निशाणा दोन दिवसांपूर्वी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. यावरून देखील संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीनने जेवढी घुसखोरी केली तेवढी घुसखोरी मागील सत्तार वर्षात झाली नव्हती असं राऊत यांनी म्हटलं आहे.