सांगली, 18 जानेवारी : नशेच्या आहारी गेलेल्या कोणत्याही व्यक्तीची सवय बदलणे खूप अवघड असते. सांगली जिल्ह्यातील 40 कुटुंबामध्ये हा चमत्कार घडला आहे. अनेक डॉक्टर, मोटिव्हेशनल स्पीकर्स, वेगवेगळे कार्यक्रम यामधून जे शक्य होत नाही तो चमत्कार त्यांच्या मुलांनी करून दाखवला आहे. कसा घडला चमत्कार? सांगलीमधील जत तालुक्यातील पांडोरझरीमधील बाबरवस्तीच्या शाळेत हा चमत्कार घडलाय. या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोड कामगार आहेतत. ऊसतोडणीसाठी स्थालंतर करणाऱ्या या पालकांंमध्ये व्यसानधिनतेचं प्रमाण जास्त आहे. येथील शिक्षकांनी पालकांना व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांच्या मुलांची मदत घेण्याचं ठरवलं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले. दारू, विडी-सिगारेट, मावा, गुटखा, तंबाखूचं सेवन आरोग्यासाठी कशा प्रकारे हानिकारक आहे, यावर मुलांशी चर्चा केली. त्याचे दुष्परिणाम मुलांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन व्यसनमुक्तीचे फायदे-तोटे समजावून सांगितले. विद्यार्थी वस्तीवरील लोकांना तोंडाच्या कॅन्सरचे फोटो दाखवत फिरायचे. आपल्या वडिलांनी या पदार्थाचं सेवन करू नये म्हणून विद्यार्थ्यांनीच प्रयत्न सुरू केले. Video : ग्रामीण भागालाही जंक फुडचा विळखा, निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांनी दिला सल्ला पालकांवर झाला परिणाम मुलांनी आग्रह सुरू केल्यानं वडिलांमध्ये बदल झाले. मुलांनी पालकांवर रुसून बसून प्रसंगी त्यांचा मार खाऊन वडिलांना व्यसन सोडायला भाग पाडले. पाच वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. 40 कुटुंब संपूर्णपणे व्यसनमुक्त झाली. वडिलांना व्यसनमुक्त करणाऱ्या मुलांनी आपणही व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, हा धडा शाळेत गिरविला आहे.
शाळेतील दिलीप वाघमारे सरांच्या शिकवणुकीचा मुलांवर परिणाम झाला. त्यांनी घरी हट्ट धरला आणि माझे पती व्यसनमुक्त झाले, अशी माहिती सीता बाबर यांनी दिला. या विद्यार्थी आणि शिक्षकांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे.