मुंबई, 14 सप्टेंबर : मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकणातील अनेक जिल्ह्यांसह राज्याच्या मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 14) कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. (Rain Alert) अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याती विविध भागात पावसाची शक्यता आहे. वायव्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र गोव्याच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोल्हापूरसह कोकणातील जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर नद्यांना पुराच्या पाण्याचा विळखा बसल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
हे ही वाचा : पोहणे जीवावर बेतले, आठवीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेल्या मान्सूनची आस, महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता.14) दक्षिण कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे. याबाबत हवामान खात्याने माहिती दिली आहे. यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे सांगण्यात आले आहे.
भंडारा-गोंदियात पावसाचा हाहाकार
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. मुंबई, ठाण्यापासून राज्यातील अनेक वेगवगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये देखील तशीच अवस्था आहे. पाऊस इतका कोसळतोय की भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे दोनवेळा सर्वच्या सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. पावसाचा कहर हा भंडारा पाठोपाठ गोंदिया जिल्ह्यातही पाहायला मिळतोय.
भंडारा जिल्ह्यात आज पडलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले आहेत. यापैकी 23 दरवाजे हे 1 मीटरने तर 10 गेट अर्ध्या मीटरने उघडले आहेत. धरणातून 6263 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
हे ही वाचा : Akola : ह्रदयद्रावक! तंबाखूची डबी आणि चप्पलामुळे झाला घात, आजोबा आणि नातू गेले पुराच्या पाण्यातून वाहून
भंडारा जिल्ह्यात सतत पावसाने गोसीखुर्द धरणात पाण्याची आवाक अद्यापही वाढत आहे. गोसीखुर्द धरणात पाणी पातळीत आज दिवसभरात दुसऱ्यांदा वाढ झाल्याने संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघण्यात आले आहेत. यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.