पुणे, 12 जून : आपण ऐहिक वैभव आणि भौतिक सुखाच्यामागे इतके लागलो आहोत की आपण माणूस आहोत याचा आपल्याला विसर पडताना दिसत आहे. या जगात पैसेच सारं काही आहे, अशी भावना दिवसेंदिवस जास्त दृढ होताना दिसत आहे. त्यामुळे माणुसकी प्रचंड आटताना दिसत आहे. म्हणूनच पैसे आणि संपत्ती किंवा मालमत्तेसाठी काही जण रक्ताच्या नात्यातील माणसांचादेखील जीव घ्यायला मागेपुढे बघत नाहीय. सध्याचं हे वास्तविक वातावरण प्रचंड भयानक आहे. पुणे जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलोपार्जित आईच्या हिस्स्याची जमीन वाटणीचे पैस मिळावे, अशी मागणी करणाऱ्या एका भाच्याची त्याच्या सख्ख्या मामानेच हत्या केली आहे. अतिशय भयानक अशी ही घटना आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही खेड तालुक्यातील सेझमध्ये घडली आहे. मृतक तरुणाचं नाव अजय भालेराव असं आहे. तो 25 वर्षांचा होता. तर शांताराम शिंदे आणि सुनील शिंदे असं तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. शांताराम शिंदे हा मृतक तरुणाचा मामा आहे. तर सुनील शिंदे हा मृतकाचा मामेभाऊ होता. मृतक अजयचे आपल्या मामासोबत गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या पैशांवर वाद सुरु होता. दोघांमध्ये जमिनीच्या पैशांवर अनेकदा भांडण झालं होतं. त्यांच्यातील हा वाद विकोपाला गेला आणि धक्कादायक घटना घडली. ( पंकजा मुंडे समर्थकांचा भाजप कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न, औरंगाबादेत तुफान राडा ) अजयने आपल्याला मामाकडे जमिनीच्या पैशांची मागणी केली तेव्हा त्यांच्यात मोठं भांडण झालं. या भांडणात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाणीला सुरुवात झाली. अखेर हा वाद विकोपाला गेला आणि मामाने खेड सेझ परिसरातील कमानीजवळ भाचा अजयच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी मामा आणि मामेभाऊ घटनास्थळावरुन पसार झाले. संबंधित घटनेनंतर थोड्यावेळाने अजयच्या हत्येची माहिती समोर आली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. राजगुरु पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.