पुणे, 17 सप्टेंबर : देशात भाजपचे 144 मतदार संघात खासदार नाहीत या अनुषंगाने भाजपकडून वेगळी रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. (Shirur Lok Sabha constituency) यासाठी ज्या मतदार संघात भाजप कमकुवत आहे किंवा भाजपचा उमेदवार नाही त्या भागात भाजपकडून आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू आहे. अशा मतदारसंघांमध्ये भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र 16, तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती आणि मावळ मतदारसंघाचा समावेश आहे. यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री सिंह यांनी तीन दिवसांचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून भाजपच्या पुणे शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले कि, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघावर भाजप दावा सांगणार की ही जागा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शिंदे गटाला सोडणार, हे नक्की नाही; तसेच आढळराव पाटील भाजपचे उमेदवार असतील की नाही, याबाबत आताच काहीही सांगू शकत नाही. पक्ष त्या वेळी याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे म्हणत केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी आढळराव यांच्यासह भाजपमधीलही इच्छुकांचे टेन्शन वाढविले आहे.
हे ही वाचा : बच्चू कडूंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय? पुन्हा व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO
या पार्श्वभूमीवर ही जागा भाजप लढवणार की शिंदे गटासाठी सोडणार, भाजपने लढविण्याचा निर्णय घेतल्यास पक्षातीलच नेत्याला उमेदवारी मिळणार की ऐनवेळी आढळराव यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाणार, या प्रश्नावर सिंह यांनी, ‘याबाबत आताच काही सांगता येणार नाही. योग्य वेळी पक्ष योग्य निर्णय घेईल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मला जी पक्षबांधणीची जबाबदारी दिली आहे, ती निभावत आहे,’ असे सिंह यांनी स्पष्ट केले.
सध्याचे राष्ट्रवादीचे खासदार नागरिकांना केवळ टीव्ही स्क्रीनवरच दिसतात. ते नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत, असे या दौर्यात अनेक नागरिकांनी सांगितले. ते वेळ देत नसल्याने मतदारसंघात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची यादी तयार केली असून, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर करणार आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सिंह यांनी सांगितले.
तीन दिवसांच्या दौर्यामध्ये मी प्रशासकीय अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मागील राज्य सरकारने केंद्र सरकारच्या योजना राज्यात योग्य प्रकारे राबविल्या नाहीत. विविध योजनांसाठी निधी मिळावा, यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविले नाहीत. जो निधी केंद्राने पाठवला, त्याचा लेखाजोखा नाही, योजना आणि पैसा केंद्राचा आणि त्यावर नावे व फोटो स्वतःचे टाकल्याचा आरोपही रेणुका सिंह यांनी या वेळी केला.
हे ही वाचा : ‘ही तर उदासिनता, बेफिकरी आणि अनास्था’, शिंदेंच्या त्या निर्णयावर अजितदादा संतापले
या वेळी शिरूरच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, सुनील कर्जतकर, गणेश भेगडे, धर्मेंद्र खानड्रे, अतुल देशमुख, धनंजय जाधव उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे हे शिरूरचे विद्यमान खासदार असल्याने राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मतदारसंघ सोडला जाणार नाही. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. आता भाजपकडून या मतदारसंघात तयारी केली जात आहे.