पुणे, 01 नोव्हेंबर : पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल पोलीस उपनिरीक्षक यांना भांडण सोडवण्यासाठी आलेल्या इसमांकडून मारहाण करण्यात आली आहे. नवरा बायकोचे भांडण सोडवत असताना पतीचा राग अनावर झाला आणि त्याने महिला कॉन्स्टेबल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये या दाम्पत्याने चांगलाच गोंधळ घातला होता. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत नवरा बायकोचे रस्त्यावर भांडण सुरू होते. दरम्यान या दोघांचे चालू असलेले रस्त्यावर मिटवण्यासाठी त्यांना ठाण्यात आणले गेले. यावेळी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणीही गोंधळ घातला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.
हे ही वाचा : पुण्यात बर्निंग बसचा थरार, 42 प्रवासी खाली उतरले अन् शिवशाही बस पेटली, VIDEO
संबंधित नवरा बायकोवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नवऱ्याला अटक करण्यात आली. सुनील दनाने आणि नीता सुनील दनाने (रा. कळस, विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नवरा बायकोची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अस्मिता सचिन लावंड यांनी फिर्याद दिली आहे.
पुण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर भांडण करत असल्यामुळे सुनील दनाने आणि अजय रिठे या दोघांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची विचारपूस केली जात होती. यावेळी आरोपी निता दनाने यांनी त्या ठिकाणी येऊन पोलीस अंमलदार कक्षातून अजय रिठे यांना ओढून घेऊन जाऊ लागल्या. यावेळी पोलीस शिपाई खेडकर यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता नीता दनाने हिने त्यांना हाताने मारहाण केली. तर आरोपी सुनील दनाने याने शिवीगाळ केली.
हे ही वाचा : माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गात घातपाताचा डाव? थोडक्यात टळला मोठा अनर्थ, काय घडलं नेमकं?
आरोपी सुनील दनाने याने पोलीस उपनिरीक्षक मगदूम यांच्या हाताचा अंगठा पिरगाळला आणि पोलीस ठाण्यातील खिडकीच्या काचेवर डोके आपटायला सुरुवात केली. त्यानंतर काचेचा तुकडा हातात घेऊन तो खाली पळ सुटला होता. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित नवरा बायको विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील दनाने याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम अधिक तपास करत आहेत