पुणे, 30 ऑगस्ट : गणेश चतुर्थीला दरवर्षी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. गणेशभक्त दरवर्षी गणेशोत्सव सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन (Ganesh Chaturthi 2022) उद्या होणार आहे. सर्वच घरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. सर्वांचा आवडता गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज गणपत्ती बाप्पाची मनोभावाने पुजा केली जाते. यंदा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणण्याचा विचार करत असाल तर गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेचा काय आहे शुभ मुहूर्त जाणून घ्या. शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक पंडित वसंत गाडगीळ यांनी सांगितले की, गणेश उत्सव कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक जण आपल्या शेतातल्या माती पासून गणपती बनवत असे आणि हा सण साजरा करत असे. चातुर्मास सुरु झाल्यानंतर 45 दिवसांनी भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सव सुरू होतो. या उत्सवात भाविक मोठ्या प्रमाणात सामील होतात. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. हेही वाचा : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीनं अगदी झटपट बनवा उकडीचे मोदक, पाहा VIDEO गणेश मूर्ती शेतातील मातीचीच असावी हा गणेशोत्सव पार्थिव गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. पार्थिव म्हणजे माती पासून बनवलेला गणपती. यामुळे या उत्सवासाठी लागणारी मूर्ती ही शेतातील मातीचीच असावी. शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिस अथवा धातूची नसावी. कोणत्या वेळी करावी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना यासाठी ब्रह्म मुहूर्तावरती उठून अभ्यंगस्नान करून सूर्योदयापासून पूजा-अर्चना सुरु करावी. सूर्योदयानंतर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करावी. दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान नैवेद्य दाखवावा. सकाळी आणि संध्याकाळी न चुकता आरती म्हणावी. यावेळी ओम गं गणपतये नमः या मंत्राचा एका मिनिटांमध्ये कमीत कमी सात ते आठ वेळा उच्चार करावा व आपल्याला जमेल तेवढा वेळ देवाची भक्ती भावाने पूजा करावी. तसेच जेवढे दिवस आपल्याकडे गणपती आहे तेवढे दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला पूजा आणि आरती करावी. गणपतीला नैवेद्य म्हणून आपल्या चालीरीतीनुसार गोडधोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. गणपतीला दुर्वा, जास्वंदाची फुले किंवा लाल फुले आवडतात. त्यामुळे ते देखील गणेशाला अर्पण करावेत, असं शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक पंडित वसंत गाडगीळ सांगतात.