चंद्रकांत फुंदे, पुणे. मुंबई/पुणे, 6 सप्टेंबर : सध्या राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील मोठ्या शहरांपासून कोकणातील खेड्यापर्यंत सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. अशात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पुण्यातील मानाच्या 5 गणेश विसर्जन मिरवणुकीच्या परंपरेला आव्हान देणारी ऐनवेळीची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. पण त्याचवेळी रूढी म्हणजे कायदा नसल्याचंही परखड मत हायकोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे यंदापुरता हा वाद टळला असला तरी पुढच्यावर्षी पुन्हा हा प्रश्न उद्भवू शकतो. काय आहे नेमका हा वाद? पुण्यातली विसर्जन मिरवणूक परंपरेनुसारच होणार, पण.. पुण्यात टिळकांच्या काळांपासून मानाच्या गणेश मंडळांची परंपरा आहे. बाप्पाची विसर्जन मिरवणूकही त्याच क्रमाने पार पडते. पण यंदा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर छोट्या गणपती मंडळांनी या परंपरेला थेट आव्हान देणारी याचिकाच हायकोर्टात दाखल केल्याने आता या परंपरेचं कसं होणार? असा प्रश्न पडला होता. पण अखेर हायकोर्टानं ही ऐनवेळची याचिकाच रद्दबातल ठरवल्याने पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा जीव भांड्यात पडलाय. याचिककर्त्यांच्या मागणीत तथ्य नसल्याचं मत कोर्टानं नोंदवलं आहे. मानाचे गणपती निघेस्तोवर विसर्जनासाठी थांबावं लागत असल्याचा आक्षेप या याचिकेत, शैलेश बधई यांनी घेतला होता. विसर्जन तोंडावर असताना दाखल याचिकेवर राज्य सरकारनं सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र, याच सुनावणी दरम्यान, कोर्टानं सरकारी वकिलांना, रूढी आणी परंपरा म्हणजे कायदा नव्हे हे सुनावलं. या याचिकेकरिता खास पुण्यातील मानाच्या गणपतीचे सर्व प्रमुख मानकरी उच्च न्यायालयात हजर होते. वाचा - Ganeshotsav 2022 : यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील ‘हे’ 10 गणपती नक्की पाहा पुन्हा कोर्टात जाणार : याचिकाकर्ते दरम्यान कोर्टाचा निकाल आम्हाला मान्य असून आमच्या याचिकेतील त्रुटी आम्ही दुरूस्त करून पुढच्या वर्षी पुन्हा वेळेआधीच याचिका दाखल करू, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. तसंच रूढी, परंपरा हा कायदा होऊ शकत नसल्याचं हायकोर्टाचं मतही त्यांनी अधोरेखित केलं आहे. काय आहे वाद? पुण्यात विसर्जन मिरवणुकीतील हा वाद खरंतर परंपरेला आक्षेप घेण्याचा नाही. तर या मानाच्या मंडळांमुळे विसर्जन मिरवणुकीला होणाऱ्या विलंबाला आहे. कारण मानाची पाच मंडळंच जर जास्तीची ढोल पथकं लावून अख्खा दिवस लक्षीरोडवर रेंगाळत असतील तर मग आम्ही बाकीच्या 50 मंडळांनी काय फक्त पाच तासाच मिरवणूक उरकायची का? हा खरा या छोट्या मंडळांचा सवाल आहे. त्यामुळे यावेळी तरी मानाची मंडळ विसर्जन मिरवणुकीला विलंब लावणार नाहीत अशी आशा आहे.